साहेब, रजाच वेळेवर मिळत नाही... पगाराची कपात कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:25 AM2021-09-27T04:25:17+5:302021-09-27T04:25:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साहेब, सलग काम करूनही रजाच दिली जात नाही, पगारात ही कपात कशासाठी केली?, पोलीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : साहेब, सलग काम करूनही रजाच दिली जात नाही, पगारात ही कपात कशासाठी केली?, पोलीस सेवा संपत आली तरीही पदोन्नती कधी मिळणार? अशा स्वरूपाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांच्या अंतर्गत तक्रारी समाधान हेल्पलाइनवर पोलीस अधीक्षकांना प्राप्त होत आहेत. पोलिसांचे काम सुरळीत व्हावे, काम करताना ते नेहमी समाधानी रहावेत यासाठी त्यांच्या तक्रारीचे तातडीने निवारण करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांमार्फत दिले आहेत. त्यानुसार गेल्या पाच वर्षात तब्बल १२०९ तक्रारी दाखल झाल्या तर गेल्या आठ महिन्यात ११० तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्या जास्तीत जास्त निर्गतीकरणाचा प्रयत्न केला जात आहे.
कोरोना महामारीत आरोग्य विभागाबरोबरीने पोलीस खात्याने जिवाची बाजी लावून चोवीस तास सेवा बजावली आहे. पण त्याबाबत त्यांनी तक्रारी केल्या नाहीत. पण इतर प्रशासकीय कामाबाबत मात्र पोलिसांनी समाधान हेल्पलाइनवर तक्रारी नोंदवल्या आहेत.
२०२१ मध्ये दाखल तक्रारी
जानेवारी : १२
फेब्रुवारी : १५
मार्च : २२
एप्रिल : ००
मे : ००
जून : १६
जुलै : १९
ऑगस्ट : २६
दर गुरुवारी ‘समाधान’ तक्रार निवारण
२०२० मध्येही कोरोनाशी मुकाबला करताना १६७ तक्रारी दाखल झाल्या. त्या सर्वच निर्गत करण्यात पोलीस अधीक्षकांना यश आले. गेल्या आठ महिन्यातही दाखल ११० तक्रारींचे निर्गतीकरण केले. दर गुरुवारी दुपारी ४ ते ६ या वेळेत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे हे स्वत: गृह पोलीस उपअधीक्षक, वेलफेअर पोलीस निरीक्षक यांच्यासह एकत्र बसून पोलीस कर्मचाऱ्यांच्या लेखी तक्रारींचे जागीच निर्गतीकरण करतात. ज्या तक्रारी मागे राहतात, त्या आठवड्यात त्या-त्या विभागाकडे पाठपुरावा करून निर्गतीकरण करतात.
जोखीम भत्ता दिला नाही, पदोन्नतीत डावलले
आठवडाभर काम करूनही रजा मिळत नाही, जोखीम भत्ता दिला नाही, पदोन्नतीत डावलले जातेय, पगार काढण्यास उशीर का? वैद्यकीय बिले सादर केली; पण संबंधित लिपिक पुढे पाठवत नाहीत. बक्षिसांची नोंद सर्व्हिस सीटवर घेण्यास लिपिक टाळाटाळ करत आहेत. पगारातील कपात कशासाठी, पगारातील फरक मिळत नाही आदी तक्रारींचे पोलीस खात्यात स्वरूप आहे.
वरिष्ठांविरोधात तक्रारच नाही
गेल्या वीस महिन्यात समाधान हेल्पलाइनवर जिल्ह्यातील एकाही पोलीस अधिकाऱ्याविरोधात कर्मचाऱ्याने तक्रार केलेली नाही हे विशेष आहे. खरे तर काही वरिष्ठ अधिकारी हाताखालील पोलीस कर्मचाऱ्यांना हीन वागणूक देतात हे जरी सत्य असले तरीही प्रत्यक्ष तक्रार मात्र अद्यापपर्यंत कोणीही केेलेली नाही.