साहेब...! आमची गाडी आहे सोडून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:24 AM2021-04-24T04:24:07+5:302021-04-24T04:24:07+5:30
इचलकरंजी : वाढत्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने 'ब्रेक द चेन'ची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर विनाकारण मोटारसायकलवरून फिरणाऱ्या ...
इचलकरंजी : वाढत्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने 'ब्रेक द चेन'ची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर विनाकारण मोटारसायकलवरून फिरणाऱ्या व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. कारवाई करण्यात आलेले वाहन सोडविण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी व शहरातील बड्या व्यक्तींची ठाण्यांसमोर गर्दी होत आहे. तसेच काहींचे वारंवार फोन येत असल्याने शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
राज्यासह शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढणारी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. तरीही कशाचीही पर्वा न करता अनेक नागरिक शहरात निष्काळजीपणाने फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांमुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होत आहे. त्यांना आळा घालण्यासाठी नगरपालिका व पोलीस पथकांकडून कारवाई केली जात आहे.
अनेक मोटारसायकली जप्त करण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक लोकप्रतिनिधी व शहरातील बड्या व्यक्तींची धावपळ सुरू असून, काहीजणांचे फोनवरून गाडी सोडून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. साहेब.. आमच्या कार्यकर्त्याची गाडी आहे, पाहुण्यांची गाडी आहे, जवळच्या व्यक्तीची गाडी आहे, अशा विनवण्या केल्या जात आहेत. त्यामुळे वादीवादीचे प्रसंग उद्भवत आहेत.
गुरुवारी (दि.२२) एकाने वाहतूक पोलीस मोटारसायकल देत नसल्यामुळे अंगावरील कपडे काढत वाद घालण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे वाहतूक शाखेजवळ तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी हा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. शहरात दिवसभर याची चर्चा रंगली होती.
फोटो ओळी
२३०४२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत विनाकारण मोटारसायकलीवरून फिरणाऱ्यांच्या पोलिसांनी मोटारसायकली जप्त केल्या आहेत.