तंग कपड्यावरून बहिणीचा खून
By admin | Published: August 5, 2015 12:34 AM2015-08-05T00:34:55+5:302015-08-05T00:34:55+5:30
कोल्हापुरातील घटना : अमानुष मारहाण करून जिन्यावरून ढकलले; भावास अटक
कोल्हापूर : कॉलेजला जाताना तंग कपडे घालते या रागातून थोरल्या भावाने सोमवारी (दि. ३) रात्री अमानुष मारहाण करत सख्ख्या बहिणीचा खून केला. ऐश्वर्या सुनील लाड (वय १८, रा. धोत्री गल्ली, रंकाळा बसस्थानक) असे तिचे नाव आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन संशयित आरोपी ओंकार सुनील लाड (१९) याला मंगळवारी दुपारी अटक केली.
दरम्यान, ओंकार हा मनोरुग्ण असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा वैद्यकीय दाखला नातेवाइकांनी पोलिसांना दिला आहे. त्यानुसार त्याची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली. संशयित आरोपी ओंकार याला लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. यावेळी त्याच्याकडे बहिणीला का मारलेस, अशी विचारणा पोलिसांनी केली असता त्याने, मी क्लासमधून घरी आलो. बहीण व आई घरी होत्या. बहिणीला तंग कपडे घालून कॉलेजला जाऊ नकोस, असे सांगण्यासाठी रात्री बेडरूममध्ये बोलावून घेतले. यावेळी तिने ऐकण्यास विरोध केल्याने तिला मारहाण केली; परंतु असे होईल वाटले नव्हते. माझ्या हातून काय झाले, असे म्हणून तो ओक्साबोक्सी रडू लागला. पोलिसांनी सांगितले, सुनील लाड यांचे धोत्री गल्लीत तीनमजली घर आहे. पत्नी, मुलगा ओंकार व मुलगी ऐश्वर्या यांच्यासोबत ते राहतात. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयात ते वसुली अधिकारी आहेत. मुलगा ओंकार हा दहावी पास झाल्यानंतर त्याने इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी प्रवेश घेतला होता. परंतु त्यामध्ये नापास झाल्याने यावर्षी अकरावी वाणिज्य शाखेमध्ये त्याने प्रवेश घेतला आहे. तर मुलगी ऐश्वर्या अकरावी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत होती. दरम्यान, ओंकार सोमवारी सकाळी कॉलेजला गेला. त्यानंतर दुपारी क्लासला जाऊन सायंकाळी साडेपाच वाजता घरी आला. रात्री साडेआठच्या सुमारास त्याने बहीण ऐश्वर्याला तिसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये बोलावून घेतले.
यावेळी त्याची आई जेवण करत होती, तर वडील बाहेर गेले होते. अचानक बेडरूममधून ऐश्वर्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने आई बेडरूमजवळ गेली असता दरवाजा बंद होता. आतमध्ये ओंकार तिला अमानुषपणे मारहाण करत होता. यावेळी आईने त्याला दरवाजा उघडण्यास सांगितले. काही वेळाने त्याने दरवाजा उघडला असता ऐश्वर्या रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेली दिसली. तिच्या डोक्यात गंभीर जखम झाली होती. अंगावरही जखमा व मारहाणीचे वळ होते. आईने त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिलाही त्याने मारहाण केली. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या बहिणीला ओढत आणून जिन्यावरून खाली ढकलून दिले. यावेळी त्याच्या आईचा आक्रोश ऐकून शेजारी जमा झाले. त्यांनी जखमी ऐश्वर्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री उशिरा तिचा मृतदेह सीपीआरमध्ये आणण्यात आला. तिच्या डोक्यातील जखम व अंगावरील वळ पाहून डॉक्टरांनी सीपीआर पोलिसांना वर्दी दिली. पोलिसांनी मृतदेह पाहिला असता संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक गोडसे यांना कळविले. त्यानंतर गृहपोलीस उपअधीक्षक अनिल पाटील व गोडसे यांनी सीपीआरमध्ये येऊन मृतदेहाची पाहणी केली. डॉक्टरांकडे चौकशी केली असता मारहाणीत व डोक्यात गंभीर वार केल्याने मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. तिच्या आईला व नातेवाईकांना तक्रार देण्यास सांगितले. त्यांच्यापैकी कोणीच तक्रार न दिल्याने लक्ष्मीपुरी ठाण्याचे पोलीस नाईक रामदास रंगराव गायकवाड यांनी फिर्याद दिली. (प्रतिनिधी)
परिसरात हळहळ
ऐश्वर्या ही हुशार होती. तिचा स्वभाव मनमिळाऊ व प्रामाणिक असल्याने लोकांच्या मनामध्ये तिच्याबद्दल आदर होता. भावाने केलेल्या अमानुष मारहाणीत तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त झाली. पंचगंगा स्मशानभूमीत मंगळवारी पहाटे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संशयित आरोपी भाऊ ओंकार हा पोलीस ठाण्यातच बसून होता.