शिरढोणमध्ये शेतमजूर संघटनेचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:23 AM2021-03-18T04:23:03+5:302021-03-18T04:23:03+5:30
कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील मंडल अधिकारी दिलीप गायकवाड यांनी जाणीवपूर्वक बेजबाबदारपणे श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेतील कागदपत्रे ...
कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील मंडल अधिकारी दिलीप गायकवाड यांनी जाणीवपूर्वक बेजबाबदारपणे श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेतील कागदपत्रे गहाळ केली आहेत. त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने येथील गावचावडीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार पी.जी. पाटील आंदोलनस्थळी आले असता यावेळी आंदोलकांनी मंडल अधिकारी गायकवाड यांच्या चुकीच्या कारभाराचा पाढा वाचला. अखेर चुकीच्या कागदपत्रांची दुरुस्ती करण्याचे तसेच गहाळ कागदपत्रांबाबत दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास मंगळवारी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. आंदोलनाचे नेतृत्व सुरेश सासणे यांनी केले.
यावेळी सरपंच चंद्रकांत चव्हाण, उपसरपंच संभाजी कोळी, भास्कर कुंभार, अजित कुरणे, संजय जाधव आदी उपस्थित होते. आंदोलनात विश्वास बालिघाटे, शाबुद्दीन टाकवडे, शोभा पाणदारे, नवसाबाई कांबळे, मालूताई घुणके, शांताबाई सातवेकर, औरंग मुजावर, अल्लाउद्दीन नदाफ, आरीफ नदाफ, शालाबाई निर्मळ, शांताबाई जमदाडे आदी सहभागी झाले होते.
फोटो - १७०३२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरढोण (ता. शिरोळ) येथे नायब तहसीलदार पी.जी. पाटील यांनी आंदोलक महिलांना सरबत देऊन आंदोलन संपविले.