स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्यावतीने महाविद्यालयावर ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:17 AM2021-07-20T04:17:39+5:302021-07-20T04:17:39+5:30
२०२०-२१ मध्ये कोरोनाच्या महामारीमुळे शाळा व महाविद्यालये बंद राहिली. कोविड काळात पालकांचे कामधंदाही बंद झाल्याने मुलांची फी भरणे पालकांना ...
२०२०-२१ मध्ये कोरोनाच्या महामारीमुळे शाळा व महाविद्यालये बंद राहिली. कोविड काळात पालकांचे कामधंदाही बंद झाल्याने मुलांची फी भरणे पालकांना अवघड जात आहे.
यामुळे बीसीए भाग १, २ व ३ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फीमध्ये ५० टक्के सवलत मिळावी, यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेने महाविद्यालयाकडे फी सवलत मिळण्यासाठी अर्ज केला होता. याबाबत कोणताही निर्णय झाला नाही.
त्यामुळे सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सौरभ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी संस्थेने वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावर प्राचार्य व्ही. एस. ढेकळे यांनी सोमवारी (दि. २६) सकाळी अकरा वाजता बैठकीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
संस्थेच्या मीटिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा; अन्यथा महाविद्यालयामधील कोणत्याही शिक्षकाला बाहेर सोडणार नाही व महाविद्यालयाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात जिल्हाध्यक्ष स्वप्निल चौगुले, तेजस कुलकर्णी, अण्णा सुतार, सम्मेद चौगुले, यश शेळके यांच्यासह रामदास कोळी, गोवर्धन दबडे, सतीश मगदूम, विश्वास बालिघाटे, सतीश पाटील, विकास चौगुले आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
१९०७२०२१-आयसीएच-०२
फीमध्ये सवलत मिळावी यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्यावतीने महाविद्यालयात दारात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
छाया-उत्तम पाटील