आजऱ्यातील धरणग्रस्तांचे घरासमोरच ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:25 AM2021-05-27T04:25:12+5:302021-05-27T04:25:12+5:30
आजरा : आजरा तालुक्यातील धरणग्रस्तांनी आपल्या घरासमोर आंदोलन करीत कोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसन संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तालुक्यातील ...
आजरा : आजरा तालुक्यातील धरणग्रस्तांनी आपल्या घरासमोर आंदोलन करीत कोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसन संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तालुक्यातील धरणग्रस्तांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर ठेवीत आपल्या घरासमोरच ठिय्या आंदोलन केले.
कोयना धरण पूर्ण होऊन ६० वर्षे झाली तरी धरणग्रस्तांचे पुनर्वसन मात्र अजूनही झालेले नाही.
गेले बारा दिवस सातारा, सांगली, रत्नागिरी, ठाणे, पालघर, अहमदनगर जिल्ह्यात नेऊन टाकलेले ५० हजारांहून अधिक धरणग्रस्त श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर व कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले आहेत.
कोरोनाच्या काळात एकत्र न जमता आपापल्या गावी घरासमोर सुरक्षित अंतर ठेवून सर्व नियम पाळून आंदोलनास बसले आहेत.
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होऊन कोयना पुनर्वसनासाठी टास्क फोर्स स्थापन केले. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होऊन १ मे ला संकलन मंजुरीसह जमीन वाटप ठरले होते. पण त्याची पूर्तता मात्र झाली नाही. म्हणून श्रमुदच्या नेतृत्वाखाली कोयना धरणग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज (बुधवारी) आजरा तालुक्यातील धरणग्रस्तांनी एक दिवसाचे ठिय्या आंदोलन केले.
कोयना धरणग्रस्तांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आजरा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरतील असा इशाराही कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलकांनी दिला.
फोटो ओळी : उचंगी प्रकल्पांतर्गत जेऊर (ता. आजरा) येथील धरणग्रस्त आपल्या घरासमोरच ठिय्या आंदोलन करताना.
क्रमांक : २६०५२०२१-गड-०१