पानसरे हत्येच्या तपासासाठी ‘एसआयटी’ नेमा
By admin | Published: April 17, 2015 10:25 PM2015-04-17T22:25:53+5:302015-04-18T00:06:44+5:30
हायकोर्टात याचिका : सोमवारी सुनावणी शक्य
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासाठी उच्च न्यायालयाच्या व राज्याचे पोलीस महासंचालकांच्या नियंत्रणाखाली विशेष तपास पथक (स्पेशल इन्व्हिस्टिगेशन टीम) नियुक्त करावी, या मागणीसाठी पानसरे कुटुंबीयांच्यावतीने शुक्रवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने याचिका दाखल केली असून, तिची सुनावणी सोमवारी (दि. २०) होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांनी ही माहिती दिली.
पानसरे यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झाले तरी त्याबाबत कोणताच सुगावा लागलेला नाही. पोलीस ‘आम्ही मारेकऱ्यांना लवकरच पकडू,’ असा दावा वारंवार करीत असले तरी यासंदर्भात त्यांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही. दोन महिन्यांत संशयित मारेकऱ्यांचे रेखाचित्रही त्यांना प्रसारित करता आलेले नाही. त्यामुळे हा तपास विशेष तपास पथकांकडे सोपविण्यात यावा. हे पथक पोलीस महासंचालकांना उत्तरदायी असावे व त्यावर न्यायालयाचे नियंत्रण असावे, अशी मागणी या याचिकेत केली आहे.
ही याचिका मुलगी स्मिता पानसरे व सून मेघा पानसरे यांच्यावतीने करण्यात आली आहे. राज्य शासनाला त्यामध्ये प्रतिवादी केले आहे.