गॅस दाहिनी स्मशानभूमीत दाखल उद्यापासून जोडकाम सुरू ,जानेवारीपासून दाहिनी कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:43 AM2017-12-07T00:43:12+5:302017-12-07T00:44:00+5:30
\कोल्हापूर : नेहमी प्रागतिक विचारसरणीचा स्वीकार करणाºया कोल्हापूर शहरात लवकरच येथील पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनीचा वापर सुरू होणार
कोल्हापूर : नेहमी प्रागतिक विचारसरणीचा स्वीकार करणाºया कोल्हापूर शहरात लवकरच येथील पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनीचा वापर सुरू होणार आहे. सध्याच्या प्रचलित शेणी व लाकडांच्या पारंपरिक पद्धतीमुळे अंत्यसंस्कारास लागणारा वेळ, होणारे प्रदूषण या गोष्टींचा विचार करून ही गॅसदाहिनी बसविण्यात येत असून, विशेष म्हणजे मूळचे कोल्हापूरचे असलेल्या परंतु व्यवसायाच्या निमित्ताने बडोद्यात स्थायिक झालेल्या राजेंद्र चव्हाण यांनी ही दाहिनी मोफत दिली आहे. उद्या, शुक्रवारपासून ही दाहिनी जोडण्याचे काम सुरू होणार आहे.
कोल्हापूर शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून पंचगंगा स्मशानभूमीत सुविधा कमी पडत आहेत. अपुरे बेड, पार्किंगची गैरसोय यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे विस्तारीकरणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. याबाबत स्मशानभूमीच्या विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्याचे आदेश आयुक्त अभिजित चौधरी यांनी नुकतेच दिले आहेत.
गुजरात राज्यात सगळीकडे स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसविल्या गेल्या आहेत. राजेंद्र चव्हाण यांचा बडोद्यात गॅस दाहिनी तयार करण्याचा कारखाना आहे. जवळपास २०० हून अधिक ठिकाणी त्यांनी गॅस दाहिन्या बसविल्या असून त्या उत्तमप्रकारे सुरू आहेत.
चव्हाण यांनी अशीच एक गॅस दाहिनी कोल्हापुरात सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु सुरुवातील अधिकाºयांकडून तसेच पदाधिकाºयांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता; परंतु महापौर हसिना फरास, तत्कालिन उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी पुढाकार घेऊन सादरीकरण पाहिले होते. महापालिका सभेत गॅस दाहिनी बसविण्याचा ठरावही झाला आहे.
दोनच दिवसांपूर्वी चव्हाण यांनी ही गॅस दाहिनी कोल्हापूरला पाठविली असून ती पंचगंगा स्मशानभूमीत पूर्वी डिझेल दाहिनी बसविली होती तेथे ठेवण्यात आली आहे. उद्या, शुक्रवारपासून ही गॅस दाहिनी जोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी बडोद्याहून तीन कारगीर येत आहेत. जोडकाम तसेच काही सिव्हील काम करण्यासाठी किमान आठ दिवस लागणार आहेत. त्यानंतर इलेक्ट्रीफिकेशनची कामे पूर्ण केली जातील. नवीन वर्षांत ही दाहिनी प्रत्यक्षात सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विस्तारीकरणाची : गरज
वाढत्या लोकसंख्येमुळे स्मशानभूमीत सुविधांची वाणवा असून, त्यामुळे नागरिकांना अत्यंसंस्कारावेळी वाट पहावी लागते. गॅसची दाहिनी बसविल्यानंतर ही अनेक कामे तातडीने करणे गरजे आहे. स्मशानभूमीत विकासकामे लवकरात लवकर सुरु करण्याची गरज आहे.