गॅस्ट्रोसदृश साथीबाबत नागरिकांत संभ्रमाची अवस्था

By admin | Published: November 4, 2014 10:31 PM2014-11-04T22:31:11+5:302014-11-05T00:03:48+5:30

मुरगूड ग्रामीण रुग्णालयात २०० जणांवर उपचार : परिसरातील सर्वच गावांतील पाणी दूषित झाले काय?

The situation of confusion among citizens about gastroscope | गॅस्ट्रोसदृश साथीबाबत नागरिकांत संभ्रमाची अवस्था

गॅस्ट्रोसदृश साथीबाबत नागरिकांत संभ्रमाची अवस्था

Next

अनिल पाटील- मुरगूड -मुरगूड शहराच्या आजूबाजूच्या सर्वच गावांमध्ये गॅस्ट्रोसदृश साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. दूषित पाण्यामुळेच गॅस्ट्रोची लागण होते, असा दावा वैद्यकीय अधिकारी करत असले, तर मग परिसरातील सर्वच गावांतील पाणी दूषित झाले काय? असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहत असून, नागरिकांत मात्र संभ्रमाची अवस्था आहे.
परिसरातील सर्वच गावांतून मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत २०० हून अधिक रुग्णांवर योग्य उपचार झाले असून, अद्यापही नवीन रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून याबाबत ठोस पावले उचलावीत व या साथीला लगाम घालावा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दीपावली सुरू झाल्यापासून सुरुपली, यमगे, शिंदेवाडी, हळदवडे, हळदी, करंजिवणे, दौलतवाडी, चिमगाव, अवचितवाडी, आदी गावांतील जुलाब, उलट्या, अशक्तपणा असणारे हाताच्या बोटांवर मोजता येतील, असे रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल झाले होते; पण दिवसेंदिवस या प्रकारच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. विशेषत: यमगे, शिंदेवाडी, सुरुपली, हळदवडे या गावांतील रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामध्ये काही रुग्ण खासगी रुग्णालयातही दाखल झाले होते. हळदवडे गावात, तर चिखली आरोग्य विभागामध्ये कणकण अशीच होती. त्यामुळे गॅस्ट्रोसदृश आजाराचे कारण दूषित पाणी हेच होऊ शकते. पैकी सुरुपली या एका गावालाच फक्त वेदगंगा नदीतून पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी वेगळी यंत्रणा आहे. शिंदेवाडीमध्ये तर स्वतंत्र फिल्टर व्यवस्था आहे; पण या गावातही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले आहेतच. यमगे गावामध्ये लागण झालेल्या काही रुग्णांपैकी काहीजण नळाचे, तर काहीजण कूपनलिकेचे पाणी पिण्यासाठी वापरतात. हळदवडेतही विहीर व जॅकवेलमधून पाणी पुरविले जाते. मग एकाच वेळी या सर्व गावांतील पाणी कसे प्रदूषित होईल, याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे. वेदगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाले असेल, तर या नदीकाठावरील अन्य गावांत मात्र अशा प्रकारचे रुग्ण दिसून येत नाहीत. या सर्व गावांमध्ये पिंपळगाव, चिखली व मुरगूड आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले आहे. लोकांना लक्षणे व उपचारांविषयी सर्व ती माहिती दिली आहे. तरीसुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात याच लक्षणाचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे यावरील सर्व गावांतील पिण्याचे पाणी तपासून घेऊन त्यानुसार योग्य ती कार्यवाही होणे महत्त्वाचे आहे.
बारा वर्षांच्या आठवणी ताज्या
बारा वर्षांपूर्वी यमगे गावामध्ये गॅस्ट्रोची साथ मोठ्या प्रमाणात पसरली होती. त्यावेळी १०० ते ४०० जणांना याची लागण झाली होती. त्यामुळे तिघांचा मृत्यूही झाला होता.
त्यावेळची परिस्थिती भयावह होती, अशा आठवणी अनेक रुग्णांनी ताज्या केल्या. त्यामुळेच आताच्या या परिस्थितीवर तत्काळ युद्धपातळीवर प्रयत्न करून आळा घालणे गरजेचे असल्याचे अनेकांनी सांगितले.

या परिस्थितीत ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी उकळून, गार करूनच प्यावे. जास्त थंड पदार्थ, तेलकट पदार्थ, फराळाचे साहित्य खाण्याचे टाळावे. शक्यतो शेतामध्ये, उन्हामध्ये घरातून नेलेले पाणी पिण्यास वापरावे. रुग्णांनी घाबरून जाऊ नये, लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयाशी संपर्क साधावा, त्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.
- डॉ. शामसुंदर सागर,
वैद्यकीय अधिकारी, मुरगूड ग्रामीण रुग्णालय

Web Title: The situation of confusion among citizens about gastroscope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.