Everest Trekking : एव्हरेस्टवर अजूनही परिस्थिती जैसे थे, प्रचंड वाऱ्यासह बर्फवृष्टी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 06:43 PM2021-05-28T18:43:51+5:302021-05-28T18:49:06+5:30
Everest Trekking : वेगवान वाऱ्यासह प्रचंड प्रमाणात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकर हिच्या एव्हरेस्ट मोहिमेला सलग तिसऱ्या दिवशीही खीळ बसली आहे. अजूनही तिच्यासह तीनशे जण वेदर विण्डो मिळेल या आशेवर कॅम्प दोनवर तळ ठोकून आहेत. मात्र, कॅम्प दोनवर असलेली कस्तुरी सावेकर आणि इतर गिर्यारोहक सुरक्षित आहेत, अशी माहीती कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांना शुक्रवारी मिळालेली आहे.
कोल्हापूर : वेगवान वाऱ्यासह प्रचंड प्रमाणात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकर हिच्या एव्हरेस्ट मोहिमेला सलग तिसऱ्या दिवशीही खीळ बसली आहे. अजूनही तिच्यासह तीनशे जण वेदर विण्डो मिळेल या आशेवर कॅम्प दोनवर तळ ठोकून आहेत. मात्र, कॅम्प दोनवर असलेली कस्तुरी सावेकर आणि इतर गिर्यारोहक सुरक्षित आहेत, अशी माहीती कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांना शुक्रवारी मिळालेली आहे.
कॅम्प दोनवर अजूनही प्रचंड वाऱ्यासह बर्फवृष्टीमुळे १० फुटांच्या पुढचे काहीही दिसत नाही. तंबूही मोठ्या प्रमाणात ओले झाले आहेत. त्यात कपडेही ओली झाली आहेत. ती वाळण्याची संधी नाही. खाण्याचे साहित्यही संपत आले आहे. कॅम्प दोनवरुन खालीही जाता येत नाही आणि वरही जाता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शुक्रवारी स्नो फॉलमुळे सॅटेलाईट फोन काम करत नव्हते. बेसकॅम्पवरूनही कॅम्प दोनवर साहित्य येऊ शकत नाही. तरीसुद्धा हिंमत न हारता कस्तुरीसह अन्य गिर्यारोहक वेदर विण्डो मिळेल, अशा आशेवर आहेत. सर्व गिर्यारोहक धीराने आणि संयमाने या परिस्थितीशी सामना करत आहेत, एकमेकांना मदत करत आहेत, अशी माहिती गिरीप्रेमींचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी एक शेर्पा कॅम्प दोनवर कमरेखालून गंभीर जखमी झाला होता, त्याला उपचाराची गरज होती. त्याला कसेतरी करून आज सकाळी बेसकॅम्पला उतवरण्यात इतर शेर्पांना यश आले आहे. बेस कॅम्पवरुन लुक्लाहून आलेल्या एका हेलीकॉप्टरमधून त्याला हलवण्यात यश आले आहे. स्नो फॉलमुळे हेलीकॉप्टरसुद्धा नीट उडू शकत नाहीत, अशी स्थिती आहे.
कस्तुरी व अन्य गिर्यारोहक सुरक्षित
कस्तुरी सावेकरचे वडील दीपक सावेकर यांना मिळालेल्या माहीतीनुसार सॅटेलाइट फोनद्वारे बेस कॅम्पशी सकाळी संपर्क साधला गेल्यानंतर कस्तुरीसह अन्य गिर्यारोह सुखरूप आहेत, अशी माहीती मिळालेली आहे. उद्या सकाळ नंतर वातावरण क्लिअर होईल असा हवामानाचा अंदाज आहे.
समीट पूर्ण करूनच कोल्हापुरात परतू, कस्तुरीमध्ये आशावाद
तौउतेसह यास वादळामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या मोहिमेत सर्वांत कमी वयाची कस्तुरी आहे. आपल्याला वेदर विण्डो मिळेल आणि समीट आपण पूर्ण करूनच कोल्हापुरात परतू, असा आशावाद कस्तुरीमध्ये आहे. म्हणूनच अजूनही ती खडतर अशा कॅम्प दोनवर इतर गिर्यारोहकांसह तळ ठोकून आहे. श्री महालक्ष्मी अंबाबाई , दख्वनचा राजा श्री जोतिबा , व आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आर्शीर्वाद पाठीशी असल्या कारणाने कस्तुरी सह सर्व गिर्यारोहक शेर्पालोक सुखरूप आहेत, असे दीपक सावेकर यांनी कळविले आहे.