सीपीआरमधील स्थिती : आत रूग्ण तर बाहेर नातेवाईक तळमळताहेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 01:09 PM2022-03-10T13:09:11+5:302022-03-10T13:09:44+5:30
जिल्ह्याचे प्रमुख शासकीय रुग्णालय असलेल्या सीपीआरमध्ये एकीकडे रूग्ण उपचार घेत असताना बाहेर असणाऱ्या नातेवाईकांची मात्र परवड सुरू आहे. या ठिकाणी किमान एखादी धर्मशाळा उभारावी अशी मागणी होत आहे.
समीर देशपांडे
कोल्हापूर : जिल्ह्याचे प्रमुख शासकीय रुग्णालय असलेल्या सीपीआरमध्ये एकीकडे रूग्ण उपचार घेत असताना बाहेर असणाऱ्या नातेवाईकांची मात्र परवड सुरू आहे. मंगळवारी रात्री या ठिकाणी भेट दिली असता नातेवाईकांना झोपायलाही धड जागा नाही, डासांचा उच्छाद आणि पिण्याचे पाणीही विकत अशी परिस्थिती पहावयास मिळाली. या ठिकाणी किमान एखादी धर्मशाळा उभारावी अशी मागणी होत आहे.
सीपीआर हे केवळ कोल्हापूर जिल्ह्यासाठीच नव्हे तर निपाणीपासून कोकणापर्यंतच्या अनेक ठिकाणचे रूग्ण येथे दाखल होतात. सांगली जिल्ह्यातील जवळ असणाऱ्या तालुक्यातील रुग्णही येथे उपचारासाठी आणले जातात. ज्यांना कोणी वाली नाही त्यांना ‘थोरला दवाखाना’ अशी या रुग्णालयाची महती आहे.
मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रूग्ण दाखल झाले असताना त्यांच्या नातेवाईकांचे मात्र बाहेर हाल सुरू असतात. या ठिकाणी पाच छाेटे, मोठे शेड उभारण्यात आले आहेत. परंतु ही सुविधा अपुरी आहे. यामध्ये सुधारणा नाही केली तर रुग्णांच्या नातेवाईकांचे असेच हाल सुरू राहणार आहेत.
रुग्णासोबत एकजणही थांबू शकत नाही
शस्त्रक्रिया, प्रसूती झालेल्या रुग्णांजवळ एका नातेवाईकाला थांबण्याची मुभा आहे. परंतु गंभीर, अतिगंभीर रूग्ण जे अतिदक्षता विभागात आहेत तेथे कोणालाच थांबता येत नाही. या ठिकाणी बाहेरच थांबावे लागते.
पिण्याचे पाणी विकतच
शासकीय रुग्णालयातील पाणी न पिण्याची आता नागरिकांचीही मानसिकता झाली आहे. त्यामुळे सीपीआरमध्ये ज्यांना परवडते ते नातेवाईक २० रूपये लीटरचे शुद्ध पाणी आणतात. तर स्वयंसेवी संस्थेच्यावतीने या ठिकाणी १ रुपया लीटर शुद्ध पाणी उपलब्ध आहे त्याचा लाभ नागरिक घेतात. मात्र ही सोय २६ जानेवारी २०२२ ला उपलब्ध झाली आहे.
नातेवाईकांची रात्र व्हरांड्यातच
सीपीआरच्या आवारात छाेटे, मोठे पाच शेड्स आहेत. पण ते अपुरे आहेत. या ठिकाणी नातेवाईकांची ये- जा, जेवण, कपडे तिथेच वाळत घालणे यामुळे स्वच्छता राखण्यावरही मर्यादा येतात. या शेड अपुऱ्या पडत असल्याने मग व्हरांड्यातही नातेवाईक झोपण्याची सोय करून घेतात.
मी कोल्हापुरातच साने गुरूजी वसाहतीत राहतो. भावाला येथे दाखल केले आहे. या ठिकाणी माईकवरून गरज पडल्यास नातेवाईकांना बोलावले जाते. त्यामुळे फार लांब जावून चालत नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठा कट्टा आहे. त्यावरच झोपतो. -अमित बुचडे, कोल्हापूर
आईला गँगरीन झाले आहे म्हणून येथे उपचारासाठी आणले आहे. आम्ही बाहेर उघड्यावरच झोपतो. पण दिवसा उन्हाचा मोठा त्रास होतो. याच ठिकाणी पत्र्याचे शेड उभारण्याची गरज आहे. स्वच्छतागृह, अंघोळीसाठीही पैसे माेजावे लागतात. -शशिकांत लोहार, बहिरेवाडी ता. पन्हाळा
सध्या सीपीआरच्या आवारामध्ये नेमकी किती जागा शिल्लक आहे याची माहिती घेतली जात आहे. त्यानंतर नातेवाईकांसाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने धर्मशाळा उभारण्याचा प्रयत्न आहे. -डॉ. प्रदीप दीक्षित, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर