कोल्हापूर, सांगलीत महापुराने परिस्थिती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 05:11 AM2019-08-07T05:11:56+5:302019-08-07T05:12:22+5:30

Kolhapur, Sangli Flooded: ४६ हजार नागरिकांचे स्थलांतर; कऱ्हाड, पाटणही जलमय; कोकणात पूूरस्थिती कायम, मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा बंद

The situation in Kolhapur, Sangli is alarming | कोल्हापूर, सांगलीत महापुराने परिस्थिती चिंताजनक

कोल्हापूर, सांगलीत महापुराने परिस्थिती चिंताजनक

googlenewsNext

कोल्हापूर/सांगली : मुसळधार पाऊस आणि धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा विसर्ग यामुळे कोल्हापूर, सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून १५ हजार तर सांगली जिल्ह्यातून ३१ हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरु असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातही पूरस्थिती असून रस्ते व रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने संपर्क तुटला आहे.

कोल्हापूरकर असा महाप्रलय प्रथमच अनुभवत आहेत. ताराराणी चौक ते विद्यापीठ रोड व राजारामपुरी ते पार्वती चित्रमंदिर चौक ते लक्ष्मीपुरी आ़णि ताराराणी चौक ते धैर्यप्रसाद हॉल हे तीनच प्रमुख मार्ग सुरु आहेत. कोल्हापूरला जोडणारे सर्व मार्ग बंद आहेत. शहरातील मध्यवस्तीतील लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नर परिसरात रस्त्यावर गळ््यापर्यंत पाणी आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात कंबरेइतके पाणी रस्त्यावर वाहत आहे. लक्ष्मीपुरीतील सुतारवाडा, रिलायन्स मॉल परिसर, शाहुपुरीत कुंभारगल्ली, व्हीनस कॉर्नर, असेम्ब्ली रोड, केव्हीज पार्क, राजहंस प्रेस, नागाळा पार्क, रेणूका मंदिर, कसबा बावडा, लाईनबझार, न्याय संकुल परिसर, कागलकर वाडा, रमनमळा, कागलवाडी, मुक्तसैनिक वसाहत बापट कॅम्प, कदममळा आदी ठिकाणी शेकडो घरांत पाणी घुसले आहे. रामानंदनगरातील ५२ घरांत अचानक पाणी शिरल्याने भितीने हाहाकार उडाला. त्यांना बाहेर काढण्यात आले. महापुराच्या पाण्यात अजूनही सुमारे ५०० हून अधिक लोक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सातारा : पाटण, कºहाडमध्ये घुसले पाणी
कोयनेतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने सातारा जिल्ह्यातील पाटण, कºहाड तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये पूरस्थिती आहे. कºहाड शहरातील मध्यवर्ती शिवाजी चौकात कंबरेएवढे पाणी साचले आहे. तर विद्यानगरकडे जाणाऱ्या नवीन पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद करण्यात आल्याने कडेगाव, पुसेगाव, विटा राज्य मार्ग बंद झाला आहे.

कोल्हापूर : १५० प्रवासी बसस्थानकावर अडकले
औरंगाबाद, अमरावती, उस्मानाबाद, पुणे-मुंबई येथील १५० प्रवासी कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात सोमवारी मध्यरात्रीपासून अडकून पडले आहेत. रॉबिनहूड आर्मी व कोल्हापूर एसटी विभागाने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.

कोकण : पूर कायम
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण आणि राजापूर तालुक्यात पूरपरिस्थिती कायम आहे. पोलादपूर येथे झाड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरुच असून, जगबुडी पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. बाजारपेठेत पुन्हा पाणी भरले होते.

नद्यांचा विसर्ग : राधानगरी धरण : १७ हजार ४००, दूधगंगा धरण : २० हजार ३५०, वारणा धरण : ३४ हजार १२४, तुळशी धरण : ४ हजार ९४७, कोयना धरण : १ लाख १० हजार ९७०, आलमट्टी धरण : ३ लाख २० हजार ५३५.
धरणक्षेत्रात ढगफुटीसारखा पाऊस झाला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कंबरेएवढे पाणी आले होते. लोकप्रतिनिधी, अधिकारी रस्त्यावर उतरले होते. एसटीचे ३८ मार्ग बंद होते.

सांगली : महापुराचा विळखा
सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक गावे महापुराच्या विळख्यात सापडली आहेत. शेकडो घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे स्थलांतरितांचा आकडा वाढतच आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. वाट मिळेल तिकडे कृष्णेचे पाणी घुसू लागल्याने तब्बल ३१ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

नाशिक : पाच वाडे क्षणात कोसळले
संततधार पावसामुळे वाडे कोसळण्याची मालिका जुन्या नाशकात सुरूच असून, सोमवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास नाव दरवाजा परिसरात पाच वाडे अवघ्या पंधरा मिनिटांत ढासळल्याची घटना घडल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.

पंढरपूर : पुराचा वेढा
चंद्रभागेला आलेल्या पुरामुळे पंढरपूरला पुराचा वेढा पडला आहे. नदीकाठच्या झोपडपट्टीत पाणी शिरल्याने लोकांची इतरत्र व्यवस्था करण्यात आली आहे. भीमा पात्रात १ लाख ६० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होता. उजनीतून १ लाख क्युसेक विसर्ग केला असून हे पाणी पंढरीत पोहोचेल्यावर पातळी आणखी वाढण्याची भीती आहे.

श्रीरामपूर : प्रसुतीसाठी खाटेवरून प्रवास
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे सोमवारी रात्री खानापूर (ता.श्रीरामपूर) येथील आदिवासी भिल्ल समाजातील गरोदर महिलेला प्रसुतीसाठी खाटावर बसून प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यावे लागले. यात नवजात बाळाचा मात्र दुर्दैैवी मृत्यू झाला. मातेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

गोव्यातही हाहाकार
पणजी : सलग पडणाºया मुसळधार पावसामुळे व सोसाट्याच्या वाºयामुळे गोव्यात सर्वत्र जनजीवन मंगळवारीही विस्कळीत झाले. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून वीज गायब आहे. तसेच पडझडीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे.गोव्यातील सर्व शाळांना बुधवारीदेखील सुट्टी जाहीर केली आहे.
बेळगावमार्गे गोव्यात येताना लागणाºया चोर्ला घाटात दरडी कोसळल्यामुळे वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. सावंतवाडी तालुक्यातील आंबोली व दोडामार्ग तालुक्यातील तिलारी घाटही बंद आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साखळी येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

Web Title: The situation in Kolhapur, Sangli is alarming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.