कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर, जमावाकडून तोडफोड; जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या
By भारत चव्हाण | Updated: June 7, 2023 13:22 IST2023-06-07T12:52:27+5:302023-06-07T13:22:32+5:30
जमाव सैरभैर झाल्याने परिस्थिती पोलिसांच्या आवाक्या बाहेर गेली आहे.

कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर, जमावाकडून तोडफोड; जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या
कोल्हापूर : सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक झाल्या आहेत. आज कोल्हापूर बंदची हाक देत हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. बिंदू चौक, अंबाबाई मंदिर परिसर, महाद्वार रोड या परिसरात तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी जमावाकडून अनेक दुकानांची, मालगाड्यांची तोडफोड करण्यात आली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला तरी परिस्थिती नियंत्रणात येत नाही. यामुळे काही ठिकाणी पोलिसांनी अश्रूधुर कांड्या फोडल्या. जमाव सैरभैर झाल्याने परिस्थिती पोलिसांच्या आवाक्या बाहेर गेली आहे. शहरातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.
पान लाईन, महाद्वार रोडवर, माळकर तिकटी, बारा इमाम परिसर, शिवाजी रोड, अकबर मोहल्ला परिसरात जमावाकडून तोडफोड करण्यात आली आहे. शहरात सर्वच तणावपुर्ण वातावरण बनले आहे. शहरात चौकाचौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. अफवावर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
सोशल मीडियातील आक्षेपार्ह स्टेटस आणि मेसेज प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आज, बुधवारी (दि. ७) कोल्हापूर शहर बंदची हाक दिली आहे. सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने बंद आहेत. सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली. तसेच पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ४०० ते ५०० तरुण गंजी गल्लीत घुसल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. जमाव नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली. शहरातील केएमटी बससेवा, प्रवासी रिक्षा वाहतूकही बंद आहे.
परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बोलवले असून, सध्या पोलिस अधिकारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये बैठक सुरू आहे. दरम्यान, बिंदू चौकात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह, सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत.