इचलकरंजीतील सहा नगरसेवक सेनेच्या गळाला -: आठवड्यात ‘मातोश्री’वर प्रवेशाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:08 AM2019-06-13T01:08:27+5:302019-06-13T01:09:01+5:30
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे पडसाद येथील नगरपालिकेमध्ये उमटू लागले आहेत. सत्तारूढ आघाडीबरोबरच विरोधी आघाडीतील तब्बल सहा नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश
राजाराम पाटील ।
इचलकरंजी : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे पडसाद येथील नगरपालिकेमध्ये उमटू लागले आहेत. सत्तारूढ आघाडीबरोबरच विरोधी आघाडीतील तब्बल सहा नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या पवित्र्यात आहेत. आठवड्याभरात हा प्रवेश ‘मातोश्री’वर पार पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत इचलकरंजी शहरातील राजकीय क्षेत्रामध्ये खळबळजनक घडामोडी घडल्या. पूर्वाश्रमीचा माने गट पुन्हा संघटित झाला. शिवसेनेचे धैर्यशील माने यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात तब्बल ३५ हजार मताधिक्य मिळाले. साहजिकच निवडणुकीतील या घडामोडीचे परिणाम आता शहरातील आणि पर्यायाने नगरपालिकेतील राजकीय क्षेत्रात उमटू लागले आहेत.
शिवसेनेकडून श्रीमती निवेदिता माने यांनीही लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनी शिवसेनेच्याच उमेदवारीवर त्यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी निवडणूक लढविली आणि त्यांनी खासदार राजू शेट्टी यांचा पराभव केला. ही घटना इचलकरंजीच्या नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकारणाला वळण देणारी ठरली. अशा पार्श्वभूमीवर इचलकरंजी नगरपालिकेतील सत्तारूढ अगर विरोधी आघाडीमध्ये असलेल्या अनेक नगरसेवकांनी माने यांना या निवडणुकीत मदत केली. त्याचेच परिणाम आता येथील राजकीय गोटामध्ये दिसू लागले आहेत.
माने यांच्यापाठोपाठ शिवसेनेमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांपैकी एका प्रमुख नगरसेवकाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली आहे, असे ‘त्या’ नगरसेवकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. प्रवेश करू इच्छिणाऱ्यांमध्ये चार नगरसेवक सत्तारूढ आघाडीतील आहेत. त्यापैकी एकजण पूर्वाश्रमीचा शिवसैनिक आहे. तसेच एक नगरसेवक अपक्ष आणि दोन नगरसेवक ‘ताराराणी’चे आहेत. उर्वरित दोघे नगरसेवक शाहू आघाडीतील आहेत. कारण हे दोघे त्यांच्याच पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याने ते माने यांच्याबरोबरीनेच शिवसेनेमध्ये प्रवेश करू इच्छितात, असेही ‘त्या’ नगरसेवकाने स्पष्ट केले. मात्र, या राजकीय घडामोडींबाबत कमालीची गुप्तता राखली जात आहे.
सत्तारूढ आघाडी अबाधितच
इचलकरंजी नगरपालिकेमध्ये सत्तारूढ आघाडीमध्ये भाजप, राष्टÑवादी कॉँग्रेसमधील जांभळे गट व ताराराणी आघाडी यांचा समावेश आहे, तर विरोधात कॉँग्रेस व शाहू विकास आघाडी आहे. पालिकेमधील या सहाही नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तरी पालिकेतील सत्तेमध्ये शिवसेना असल्यामुळे नगरपालिकेतील सत्तारूढ आघाडी अबाधित राहणार आहे. शिवसेना प्रवेशामुळे सत्तारूढ आघाडीची संख्या दोनने वाढवून ती ३६ होणार आहे.