कोल्हापुरातील रस्त्यांसाठी सहा कोटींची मागणी --:दौलत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 10:28 AM2019-11-19T10:28:53+5:302019-11-19T10:29:53+5:30
या मागणीनंतर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘राज्यात आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणूनदेखील मी काम केले आहे; त्यामुळे नियमानुसार राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत कोल्हापूरसाठी सहा कोटी ६३ लाखांच्या निधीची मागणी केली जाईल. ही प्रशासकीय बाब असल्याने त्यावर राज्यात सरकार स्थापन नसल्याचा परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले.
कोल्हापूर : अतिवृष्टी व महापुरामुळे कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांसाठी प्रतिकिलोमीटर एक लाख रुपये याप्रमाणे राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत केंद्राकडे सहा कोटी ६३ लाखांच्या निधीची मागणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. सोमवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीदरम्यान ते बोलत होते.
महापुरानंतर कोल्हापुरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे, या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसामुळे शहरातील सर्वच रस्ते खराब झाले आहेत. महापालिकेकडे स्वत:चा फंड नाही; मात्र कोल्हापुरातून महाराष्ट्र शासनाकडे विविध कराच्या माध्यमांतून दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा कर भरला जातो. ही रक्कम शासनाच्या नियोजित उद्दिष्ट्यांपेक्षा शेकडो कोटीने जास्त आहे; त्यामुळे शासनाने आपली जबाबदारी समजून या कोल्हापुरातील रस्त्यांसाठी निधी दिला पाहिजे. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून आपण केंद्र व राज्य शासनाकडून हा निधी महापालिकेस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या मागणीनंतर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘राज्यात आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणूनदेखील मी काम केले आहे; त्यामुळे नियमानुसार राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत कोल्हापूरसाठी सहा कोटी ६३ लाखांच्या निधीची मागणी केली जाईल. ही प्रशासकीय बाब असल्याने त्यावर राज्यात सरकार स्थापन नसल्याचा परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, अजित सासणे, अॅड. पंडितराव सडोलीकर, अशोक रामचंदाणी, दादासो लाड, भरत रसाळे, सुभाष देसाई, भाऊ घोडके, राहुल ढवळे, उत्तम वंदुरे, पांडुरंग आडसुळे, किरण पडवळ, संभाजीराव जगदाळे, चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.
कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केंद्र व राज्य शासनाकडून कोल्हापुरातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.