ए.एस. ट्रेडर्सचे सहा संचालक दुबईला पळाले; तक्रारीसाठी गुंतवणूकदारांची गर्दी
By उद्धव गोडसे | Published: April 17, 2023 06:21 PM2023-04-17T18:21:01+5:302023-04-17T18:21:31+5:30
गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए.एस. ट्रेडर्स कंपनीचे सहा संचालक देश सोडून दुबईला पळाल्याची माहिती समोर आली आहे.
कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए.एस. ट्रेडर्स कंपनीचे सहा संचालक देश सोडून दुबईला पळाल्याची माहिती समोर आली आहे. या संचालकांनी गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये देशाबाहेर पाठवल्याचा अंदाज ए.एस. ट्रेडर्स विरोधी कृती समितीने व्यक्त केला आहे. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, गुंतवणूकदारांनी सोमवारी (दि. १७) पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तपास गतिमान करण्याची विनंती केली.
कमी कालावधित जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाल्यापासून ए.एस. ट्रेडर्स कंपनीचे संचालक आणि एजंट परागंदा झाले आहेत. पाच महिन्यात २७ पैकी केवळ एका संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाला असून, अन्य संचालक अटक टाळण्यासाठी न्यायालयात हेलपाटे घालत आहेत. यातील प्रमुख सहा संचालक सध्या दुबईत असल्याची माहिती कंपनीच्या काही संचालकांनीच ऑनलाईन बैठकीत दिली. प्रमुख संचालकांनी कंपनीचे कोट्यवधी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय ए.एस. विरोधी कृती समितीने वर्तवला आहे. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी तक्रारी देण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून गुंतवणूकदारांना परतावा मिळत नाही. कंपनीची कार्यालये बंद आहेत. संचालक किंवा एजंट समोर येऊन गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. आता परतावे मिळण्याची शक्यता मावळली आहे. शिवाय मुद्दलही अडकल्यामुळे हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन तपास गतिमान करण्याची विनंती केली.
तक्रारी देण्यासाठी रिघ लागली
ए.एस. ट्रेडर्सच्या गुंतवणूकदारांचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत. यातील बहुतांश ग्रुपवर सध्या कंपनीच्या विरोधातील नाराजी तीव्र झाली आहे. यातून तक्रारदारांची संख्या वाढत असून, सोमवारी ५० हून अधिक गुंतवणूकदारांनी तक्रारी देण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत गर्दी केली. फसवणूक झालेल्या इतरही गुंतवणूकदारांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन तपास अधिकाऱ्यांनी केले आहे.