सावंतवाडीत सहा फ्लॅट फोडले

By admin | Published: June 16, 2015 12:35 AM2015-06-16T00:35:36+5:302015-06-16T01:14:06+5:30

चोरट्यांचा धुमाकूळ : २० तोळे सोने, पावणेतीन लाख रोकड लंपास; पोलीस सुस्तच

Six flats have been demolished in Sawantwadi | सावंतवाडीत सहा फ्लॅट फोडले

सावंतवाडीत सहा फ्लॅट फोडले

Next

सावंतवाडी : सावंतवाडी शहर आणि परिसरात चोरांनी धुमाकूळ घातला. शहरात रविवारी रात्री सलग दुसऱ्या दिवशीही सहा ठिकाणी चोऱ्या झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. शनिवारी मध्यरात्री तीन दुकाने फोडून ८० हजारांचा माल लंपास केला होता. मात्र, रविवारी रात्री चोरट्यांनी २० तोळे सोने व रोख दोन लाख ७६ हजार रुपये, असा एकूण नऊ लाख रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. या दोन्ही चोरीप्रकरणी शहर पोलीस मात्र सुस्तच असून, एकाही चोरट्यास अटक केलेले नाही.
खासकीलवाडा परिसरातील जोग संकुल सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील दत्ताराम बाबाजी शेडगे यांचा बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडला. येथून २० तोळे सोने व लग्नासाठी आलेला आहेरही चोरट्यांनी पळविला. दत्ताराम शेडगे यांच्या मुलींचे लग्न ११ जूनला झाले होते. लग्नाचा सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर शेडगे कुटुंब आपल्या मूळगावी शिवापूर येथे काही दिवस राहण्यासाठी गेले होते. चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन शेडगे यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडले व घरात प्रवेश केला. घरातील दागिने व लग्नात आलेला आहेरही चोरट्यांनी पळविला. या चोरीपूर्वी शेजारील फ्लॅटना चोरट्यांनी बाहेरून कडी लावली असल्याचे एका शेजाऱ्याने सांगितले. याच अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटमध्ये रविवारी रात्री दोन वाजेपर्यंत धार्मिक कार्यक्रम चालू होता. यामुळे या परिसरात लोकांची वर्दळ होती. चोरट्यांनी याच अपार्टमेंटमधील एस. तोरणे यांचा बंद फ्लॅटही फोडला होता.
यानंतर मात्र चोरट्यांचा मोर्चा न्यू खासकीलवाड्याकडे वळला. येथील पांडुरंग भिमू भुसानवार यांच्या बंद खोलीतून रोखरक्कम दोन लाख २६ हजार रुपये व तीन हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. भुसानवार हे रात्री उशिरापर्यंत आपल्या दुकान बिलांचे कामकाज करीत असल्याने त्यांच्या खोलीला कुलूप होते. या खोली शेजारीच त्यांचे कुटुंब राहते. काही भाडेकरूही राहतात; पण चोरीचा त्यांना मागमूसही नव्हता. भुसानवार हे रात्री उशिरा घरी परतले व झोपी गेले. सकाळी त्यांना घराच्या शेजारील खोलीचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. न्यू खासकीलवाडा परिसरातच साई दीपदर्शन नावाचे अपार्टमेंट आहे. येथे आठ फ्लॅट असून, जे फ्लॅट बंद होते तेच फ्लॅट चोरट्यांनी फोडले. यामध्ये प्रभाकर आराबेकर (मुंबई), अमृता अविनाश सावंत (कोल्हापूर) व उदय नाईक (सावंतवाडी) यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला.
याच परिसरातील आरेकर कॉलनीत चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला; पण तो असफल झाला. येथील डॉ. प्रदीप शामराव पाटील हे कामानिमित्त गोव्याला गेले होते. त्यांच्या बंद खोलीचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातली सर्व सामान अस्ताव्यस्त करून चोरीचा प्रयत्न केला; पण येथेही त्यांना काही सापडले नाही. विशेष म्हणजे याच कपाटातील आतील कप्प्यात रोख दहा हजार रुपये व काही सोन्याचा ऐवज होता, तो चोरट्यांच्या निर्देशनास आला नाही.
श्वान घुटमळले
या घटनेची माहिती सकाळी पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित देसाई हे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला. यानंतर श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वानाने जोग संकुल सोसायटीपासून न्यू खासकीवाडापर्यंत मार्ग दाखवून तेथेच घुटमळत राहिला. या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार करीत आहेत.
नऊ लाखांचा मुद्देमाल
रविवारी रात्री झालेल्या या चोरीत २० तोळे सोने व दोन लाख ७६ हजार रुपयांची रोकड, असा एकूण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Six flats have been demolished in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.