महामार्गावर होणार सहा उड्डाणपूल
By admin | Published: December 24, 2014 11:07 PM2014-12-24T23:07:55+5:302014-12-25T00:14:12+5:30
कागल ते सातारा : हिवाळी अधिवेशनात शिक्कामोर्तब
सतीश पाटील - शिरोली -पुणे-बंगलोर महामार्गावर कागल ते सातारा या १३३ कि.मी.च्या अंतरात सहा नवीन उड्डाणपूल होणार आहेत. राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब केले.
पुणे-बंगलोर दुपदरीवर अपघातांचे प्रमाण वाढले. वाहतूक वाढली म्हणून चतुष्कोन योजनेंतर्गत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. कागल ते सातारा या १३३ कि.मी. रस्त्याचे काम सन २००६ पर्यंत पूर्ण करावयाचे होते. या कामासाठी अंदाजे ५५० कोटी रुपये खर्च होता. सुमारे पाच ठेकेदार या रस्त्याचे काम करत होते.
अनेकदा मुख्य मार्गात बदल करण्यात आला. हे काम दोन वर्षांत पूर्ण करावयाचे होते. त्यामुळे रस्ते विकास महामंडळ आणि या पाच ठेकेदारांनी घाईगडबडीने काम पूर्ण केले. रस्त्याचे काम सुरू असताना महामार्ग शेजारील अनेक गावांनी उड्डाण पूल, भुयारी मार्ग यांची मागणी केली; पण आयत्यावेळी आलेल्या मागण्या रस्ते विकास महामंडळाने गांभीर्याने घेतल्या नाहीत व महामार्ग २००६ ला वाहतुकीस खुला केला.
अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी चौपदरीकरण केले; पण अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढले. सन २००८ ते सन २०१४ या सात वर्षात या कागल ते सातारा या १३३ कि.मी. मध्ये सुमारे ७४९ अपघात झाले आहेत. यात १०४३ जखमी, तर २२६ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. यातील बरेचसे अपघात गोकुळ शिरगाव, नागाव फाटा, टोप, अंबप फाटा, येलूर, इस्लामपूर फाटा येथे झाले आहेत. ही या मार्गावरील प्रमुख अपघात क्षेत्रेच आहेत. याठिकाणी सतत वाहनांची वर्दळ असते. याठिकाणी उड्डाणपुलाची मागणी स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीने केली होती; पण त्यावेळी रस्ते विकास महामंडळाने व शासनाने ही गांभीर्याने याकडे लक्ष दिले नाही. याच सहा ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढल्याने अखेर शासनाने या रस्त्याचे सहा पदरीकरण करताना याठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय नागपूर येथे नुकत्याच झालेल्या अधिवेशनात घेण्यात आला. या सहा ठिकाणी उड्डाणपूल झाले की निश्चितच अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.
उड्डाणपुलांची ठिकाणे
गोकुळ शिरगाव, नागाव फाटा, टोप, अंबप फाटा, येलूर, इस्लामपूर फाटा.