महिलेसह सहा गुंडांना अटक

By admin | Published: July 30, 2016 12:24 AM2016-07-30T00:24:24+5:302016-07-30T00:32:06+5:30

‘हवाला’चे तीस लाख लूटमार प्रकरण : दोन मोटारसायकलींसह २३ लाखांची रोकड जप्त

Six goons with the woman arrested | महिलेसह सहा गुंडांना अटक

महिलेसह सहा गुंडांना अटक

Next

कोल्हापूर : येथील शाहूपुरी-स्टेशन रोड परिसरातील राधाकृष्ण हॉटेलसमोर मोपेडवरील चालकाला ठोसा लगावून हवालाचे तीस लाख रुपये लुटणाऱ्या सांगलीच्या महिलेसह सहा सराईत गुंडांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली व २३ लाख रुपये रोकड असा सुमारे २४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती शुक्रवारी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संशयित आरोपी सुजाता कमलेश पटेल (वय ४०, रा. गणपती पेठ, सांगली), विशाल जयसिंग मछले (२४, रा. कसबा बावडा), लखन चंद्रकांत देवकुळे (२२, रा. शिवाजी पार्क), देवेंद्र उर्फ ढेब्या रमेश वाघमारे (२४, रा. टेंबलाई रेल्वे फाटक), शुभम कृष्णात पाटील (२२, रा. केर्ले, ता. करवीर), केतन सुरेश खोत (३०, रा. राजारामपुरी चौथी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत.
सांगलीतील एम. माधव कंपनीचे कर्मचारी अरुणभाई अमृतभाई सुतार (४२, रा. मारुती मंदिर, सांगली, मूळ गाव खेरवाट, ता. महिसाना - गुजरात) ‘हवाला’चे तीस लाख रुपये घेऊन दि. २३ च्या रात्री कोल्हापुरात आले होते. येथील एम. माधवलाल कंपनीचे व्यवस्थापक निकेश जयंतीलाल पटेल यांच्यासोबत मोपेडवरून ते रेल्वे स्टेशन परिसरातील राधाकृष्ण हॉटेलसमोर आले असता याठिकाणी तिघा तरुणांनी त्यांना मारहाण केली व तीस लाख रुपये घेऊन तरुण पसार झाले होते. स्टेशन रोडसारख्या वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर मारहाण करून लूटमारीचा हा प्रकार अतिसंवेदनशील व दहशत निर्माण करणारा असल्याने तो पोलिसांना आव्हानात्मक होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, शाहूपुरी व लक्ष्मीपुरी पोलिस या लुटमारीचा संयुक्त तपास करीत होते. पोलिसांनी शोधलेल्या दाभोळकर कॉर्नर येथील सीसीटीव्ही फुटेजवरून चौघे लुटारू निष्पन्न झाले. त्यांच्या शारीरिक रचनेवरून ते सराईत गुन्हेगार असल्याची खात्री झाली होती. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे चौकशी करीत असताना खबऱ्याने पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांना ही लूटमार तडीपारीची कारवाई झालेल्या सराईत गुन्हेगार लखन देवकुळे, देवेंद्र वाघमारे, विशाल मछले, शुभम पाटील यांनी केल्याची माहिती दिली. त्यांनी तीन स्वतंत्र पथकांद्वारे शोध घेतला असता संबंधित गुन्हेगारांचे मोबाईल लोकेशन वेगवेगळ्या ठिकाणी दाखवीत होते. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक इलियास सय्यद यांच्या पथकाने धारावी झोपडपट्टी, मुंबई येथून लखन देवकुळे व ठाणे, कळवा येथून देवेंद्र वाघमारे यांना ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या पथकाने हुबळी, कर्नाटकातील गांधीवाडा परिसरातून विशाल मछले व केर्ली (ता. करवीर) येथून शुभम पाटील या दोघांना ताब्यात घेतले. उपनिरीक्षक सचिन पंडित यांनी राजारामपुरीतून सुरेश खोत व सांगलीतून सुजाता पटेल यांना ताब्यात घेतले. या सहा संशयितांकडून पोलिसांनी ३० लाखांपैकी २३ लाख रुपये हस्तगत केले. उर्वरित रक्कम त्यांनी खर्च केली आहे. आरोपींना पोलिस कोठडी मिळवून त्यांच्याकडून अधिक तपशील मिळविला जाईल, असे देशपांडे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलिस निरीक्षक प्रदीप चौगुले उपस्थित होते.
निकेशला वाघमारेने मारला ठोसा
मध्यवर्ती बसस्थानक येथून अरुणभाई सुतार व निकेश पटेल हे मोपेडवरून दाभोळकर कॉर्नर मार्गे रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असताना त्यांच्या पाठीमागून विशाल मछले व देवेंद्र वाघमारे जात होते. राधाकृष्ण हॉटेलच्या बोळात लखन देवकुळे व शुभम पाटील स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन थांबले होते. याठिकाणी निकेशच्या कानावर वाघमारे याने ठोसा लगावला. तो व सुतार मोपेडसह खाली पडल्यानंतर ते पैशांची बॅग घेऊन पसार झाले. तेथून हे सर्वजण शिवाजी पार्क येथे आले. याठिकाणी पैशाचे वाटप करून त्यांनी मुंबई, कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला. तेथून ते पुन्हा मध्यवर्ती बसस्थानक येथे आले. तेथून ते बसने मुंबई, कर्नाटकात पसार झाले.

लुटारूंचे डिजिटल
सराईत गुंड स्टेशन रोडवर नागरिकांची लूटमार करीत आहेत. त्यांचा नेहमी या परिसरात वावर असतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सावध करण्यासाठी अशा लुटारूंचे डिजिटल फलक स्टेशन रोडवर लावण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी शाहूपुरी पोलिसांना दिल्या.


दोन कोटी लूटमारीच्या प्रयत्नाची चौकशी
पोलिस असल्याची बतावणी करून कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांच्या व्हॅनसह दोन कोटी २२ लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या ऐवजावर दरोडा टाकणाऱ्या लुटारूंचा अद्याप थांगपत्ता नाही. या गुन्ह्यामध्ये या लुटारूंचा काही संबंध आहे का? त्याचीही चौकशी केली जाणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.


सांगलीच्या महिलेने दिली टिप
सुरेश खोत हा राजारामपुरी येथे राहतो. आठ महिन्यांपूर्वी त्याची सुजाता पटेल हिच्याशी ओळख झाली. पटेल ही सांगलीतील एम. माधव कंपनीच्या शेजारीच राहत असल्याने तिला अरुणभाई सुतार हे सांगलीहून कोल्हापूरलावरचेवर पैसे घेऊन जात असल्याची माहिती होती. दि. २३ जुलै रोजी सुतार हे सांगलीतून पैसे घेऊन निघाले त्यावेळी पटेल हिने केतनला फोनवरून सुतार पैसे घेऊन निघाले आहेत. त्यांनी अंगात काळे पट्टे असलेला पांढरा शर्ट घातला आहे. सोबत एअरबॅग असल्याची टिप दिली. त्यानंतर त्याने विशाल मछले, त्याचे साथीदार देवेंद्र वाघमारे, लखन देवकुळे, शुभम पाटील यांना ही माहिती दिली. या पाचजणांनी मिळून लूटमारीचा कट रचला. सुतार यांची ते मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात वाट पाहत बसले. ते बसस्थानकावर येताच केतनने त्यांना ओळखत सोबतच्या साथीदारांना माहिती दिली.


२५ हजारांचे बक्षीस
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अतिशय थंड डोक्याने या लूटमारीच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. त्यासाठी पोलिसांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. त्यांच्या या कामगिरीबद्दल संपूर्ण पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करीत असल्याचे पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सांगितले.

Web Title: Six goons with the woman arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.