कोल्हापुरात केएमटीचे सहाशे कर्मचारी संपावर, प्रवाशांची गैरसोय होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 12:18 PM2023-12-01T12:18:39+5:302023-12-01T12:20:09+5:30
३० नोव्हेंबरपर्यंत मागण्यावर तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते
कोल्हापूर : केएमटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत ३० नोव्हेंबरपर्यंत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही महापालिका प्रशासनाने बोळवण केल्यामुळे केएमटीच्या ऑफीस, वर्कशॉप, वाहतूक विभागातील सुमारे ६०० कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले. त्यामुळे आज, शुक्रवारपासून, शहरातील केएमटीची बस सेवा खंडित होणार आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, शाळा महाविद्यालयेही दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू झाली आहेत. अशा परिस्थितीत संप सुरू झाल्याने प्रवाशी वर्गाची गैरसोय होणार आहे.
महानगरपालिका परिवहन विभागाच्या (केएमटी) कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्याबाबत प्रशासनाला दिवाळी सणाच्या तोंडावर निवेदन देऊन संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, प्रशासक के. मंजूलक्ष्मी रजेवर असल्याने त्यावेळी निर्णय घेणे अवघड झाले होते. तेंव्हा ३० नोव्हेंबरपर्यंत मागण्यावर तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्यामुळे तात्पुरता संप स्थगित करण्यात आला होता.
परंतु ३० नोव्हेंबरपर्यंत प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने दुपारपासूनच केएमटी कर्मचाऱ्यांत नाराजी पसरली. दुपारच्या पाळीत कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अचानक रजा घेतल्याने अनेक मार्गावरील बसगाड्या कर्मचाऱ्यांअभावी बंद झाल्या. रात्री मुक्कामाला जाणाऱ्या १८ गाड्या कर्मचाऱ्यांमुळे जाऊ शकल्या नाहीत. मध्यरात्रीपासून सर्व कर्मचारी संपावर जात असल्याचे म्युनिसिपल ट्रान्स्पाेर्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक यांनी जाहीर केले.
राेजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पाहून तसेच राज्य सरकारची परवानगी घेऊन प्रक्रिया राबविण्यात येईल, असे प्रशासनाकडून गुरुवारी सांगण्यात आले. त्यावर युनियनने आस्थापनावरील सर्व पदे यापूर्वीच मंजूर असून रिक्त झालेल्या पदावर नियुक्ती करायची असल्याने पुन्हा सरकारची परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे सरनाईक यांनी प्रशासनाला सांगितले. तरीही प्रशासनाने आपली भूमिका बदललेली नाही. केएमटीकडे कंडक्टरची ८१ तर चालकांची ८० पदे रिक्त आहेत. ती भरावीत अशी प्रमुख मागणी युनियनने केली आहे.