सहा. कामगार आयुक्त कार्यालयाकडे तेरा पदे रिक्त
By admin | Published: November 2, 2015 12:14 AM2015-11-02T00:14:51+5:302015-11-02T00:35:34+5:30
कामगारांचे अनेक खटले प्रलंबित : हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील कामगारांची गैरसोय
इचलकरंजी : शहरातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे तब्बल तेरा पदे रिक्त आहेत. त्यामध्ये सहायक कामगार आयुक्तांबरोबर सरकारी कामगार अधिकारी, दुकान निरीक्षक, आदींचा समावेश असल्याने हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यांतील कामगारांचे अनेक खटले प्रलंबित असून, कामगार वर्गाची मोठी कुचंबणा होत आहे.
हातकणंगले व शिरोळ तालुक्यांमध्ये हजारो दुकाने व आस्थापनाची नोंदणी, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, तसेच मोठमोठे खासगी उद्योग धंदे आहेत. त्याचप्रमाणे इचलकरंजी शहरात सुमारे दीड लाख यंत्रमाग असून, या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या ७५ हजारांहून अधिक आहे. त्यामुळे येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे कामगारांच्या बाबतीत असलेली अनेक प्रकरणे नोंद होत असतात. मात्र, सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे पुरेसे अधिकाऱ्यांचे संख्याबळ नसल्याने त्यांची निर्गत होत नाही. याशिवाय दोन्ही तालुक्यांत नोंद असलेली दुकाने व आस्थापनांना अधिकाऱ्यांकडून भेटी देणे व त्यांच्या तक्रारीचे निवारण करणे, हेसुद्धा प्रचंड काम आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये इचलकरंजी शहर व आसपासच्या परिसरात असलेली कामगारांची चळवळ आणि त्यातून होणारी जनआंदोलने यांचीही संख्या मोठी आहे.
अशा पार्श्वभूमीवर येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे सुमारे २१ पदे मंजूर आहेत. त्यातील एक सहायक कामगार आयुक्त, चार सरकारी कामगार अधिकारी, नऊ दुकान निरीक्षक, चार लिपिक व चार शिपाई ही पदे कायमस्वरूपी आहेत. मात्र, या कार्यालयाकडे एक सरकारी कामगार अधिकारी, दोन दुकान निरीक्षक, दोन लिपिक व दोन शिपाई इतकीच पदे कार्यरत आहेत. उर्वरित तेरा पदे रिक्त आहेत. परिणामी येथे असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामगारांचे तंटे आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठीचा प्रचंड ताण आहे. परिणामी कामगारांच्या तक्रारी वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. म्हणून कामगार कार्यालयाकडील सर्व पदे भरण्यात यावीत, अशी मागणी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे तज्ज्ञ सदस्य भरमा कांबळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)