अकरावी प्रवेश प्रक्रियेचे ६ लाख पडूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:05 AM2018-09-08T00:05:43+5:302018-09-08T00:05:52+5:30
संतोष मिठारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपून दोन महिने उलटले, तरी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे गत वर्षाची शिल्लक असलेली ५ लाख ८७ हजार रुपयांची रक्कम विद्यार्थ्यांना परत देण्याबाबत निर्णय झालेला नाही. याबाबत प्रवेश प्रक्रिया समिती आणि डावी आघाडी, आॅल इंडिया स्टुडंट्स, यूथ फेडरेशनचे (एआयवायएफ) शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक होण्याच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत.
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे गेल्यावर्षीच्या प्रवेशपत्रातून जमा झालेल्या शुल्काची रक्कम शिल्लक असतानाही यावर्षी प्रवेशपत्राची किंमत ८० रुपये केली. त्याऐवजी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र विनामूल्य द्यावे. विनाअनुदानित तुकड्यांचे प्रवेश शुल्क कमी करावे, या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी प्रवेश अर्ज वितरण आणि संकलनाच्या पहिल्या दिवशी २५ जूनला कॉमर्स कॉलेज केंद्रावरील प्रक्रिया बंद पाडली. दोन दिवसांनी आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ आणि प्रभारी शिक्षण उपसंचालक किरण लोहार यांची बैठक झाली. त्यात लोहार यांनी, ‘गेल्यावर्षी प्रवेश अर्ज विक्रीतून जमा झालेल्या रकमेपैकी ५ लाख ८७ हजार रुपये शिल्लक आहेत. ही रक्कम परत करण्याचे नियोजन यावर्षीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केले जाईल,’ असे सांगितले होते. मात्र, त्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही.
...अन्यथा तीव्र आंदोलन
शिल्लक रक्कम विद्यार्थ्यांना परत देण्याच्या मागणीवरून आम्ही आंदोलन सुरू केले. त्यावर ऐन प्रवेश प्रक्रियेदरम्यान आंदोलन करू नये, असे आवाहन समितीने केले. त्यासह प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिल्लक रक्कम विद्यार्थ्यांना परत देण्याबाबत आॅगस्टमध्ये संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी ग्वाही समितीने दिली होती. मात्र, अद्यापही संयुक्त बैठकीसाठी आम्हाला बोलाविलेले नसल्याचे ‘एआयवायएफ’चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश फोंडे यांनी सांगितले. ते म्हणाले, आश्वासन न पाळल्याने या समितीचा निषेध करीत आहोत. संयुक्त लवकर बैठक घ्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
‘त्या’ विद्यार्थ्यांचा विचार व्हावा
अर्ज संकलित करणाऱ्या आणि प्रत्यक्षात प्रवेशित होणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत साडेचार हजारांचा फरक आहे. ज्यांनी प्रवेश घेतला नाही, त्यांना पैसे कशा पद्धतीने परत द्यावयाचे याचा विचार समितीने करणे आवश्यक आहे. पैसे परत देण्याची प्रक्रिया राबविणे शक्य नसल्यास पुढील वर्षी समितीने अर्ज विनामूल्य अथवा कमी शुल्कामध्ये द्यावेत.
गेल्या दोन वर्षांतील आकडेवारी (हजारात)
सन अर्ज विक्री संकलित अर्ज प्रवेशित विद्यार्थी
२०१७ १३२९० १२४८१ ७४०९
२०१८ १४६२३ १२७०१ ७८२२