चंदगडमधून सहा लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:18+5:302021-07-07T04:29:18+5:30
चंदगड : राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाचे भरारी पथकाने मध्यरात्री चंदगड येथील नेसरी -कोवाड या रस्त्यावर सहा लाख ...
चंदगड : राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाचे भरारी पथकाने मध्यरात्री चंदगड येथील नेसरी -कोवाड या रस्त्यावर सहा लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली. या कारवाईदरम्यान पथकाची चाहुल लागताच वाहनचालक वाहन तेथेच सोडून पसार झाला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गस्ती पथकास नेसरी-कोवाड रस्त्यावरून गोवा बनावटीची विदेशी मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गस्त घालत असताना संशयित वाहन तेऊरवाडीच्या हद्दीतील मराठी शाळेसमोर आले. गस्तीपथकाच्या वाहनाची चाहुल लागताच संशयित वाहनचालकाने वाहन तेथेच सोडून पलायन केले. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये ६ लाख ८०० रुपयांची विदेशी मद्यसाठा आढळून आला. वाहनाची अधिक झडती घेतली असता, संशयिताचा मोबाईल व लायसेन्स सापडले. त्यानुसार संशयित भरत संतू पाटील (रा. हडलगे, गडहिंग्लज) याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. या कारवाईत निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे, मारुती पोवार, राहुल संकपाळ यांनी सहभाग घेतला.