‘राजाराम’ साखर कारखान्याचे १३४६ सभासद अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 01:03 PM2020-02-15T13:03:04+5:302020-02-15T13:04:54+5:30
कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे वादग्रस्त १३४६ सभासद अखेर प्रादेशिक साखर सहसंचालक अरूण काकडे यांनी शनिवारी अपात्र केले.
कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे वादग्रस्त १३४६ सभासद अखेर प्रादेशिक साखर सहसंचालक अरूण काकडे यांनी शनिवारी अपात्र केले. किमान जमिनी नावावर नाही, स्टॅँपपेपरवर सहमती आदी कारणाने हे सभासद अपात्र ठरले असून यामुळे कारखान्याचे सर्वेसर्वा, माजी आमदार महादेवराव महाडीक यांना जोरदार हादरा बसला आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने वाढीव सभासदांविरोधात न्यायालयात तक्रार केली होती, न्यायालयाच्या आदेशानुसार सहसंचालकांनी पडताळणी केली.
‘राजाराम’ कारखान्याचा सत्तासंघर्ष गेली दहा वर्षे मंत्री सतेज पाटील व महादेवराव महाडीक यांच्यात सुरू आहे. कारखान्यांची २०१५ रोजी झालेली निवडणूक काठावर झाल्याने सत्तारूढ महाडीक गटाने मागील निवडणूकीपासूनच तयारी केली होती.
मतदारयादी प्रसिध्द झाल्यानंतर मंत्री पाटील यांच्या गटाने १८९९ सभासदांवर हरकत घेतली होती. साखर सहसंचालक अरूण काकडे यांनी गेली महिनाभर सर्व सभासदांची सुनावणी घेऊन सभासदत्वाचे पुरावे तपासले. कागदपत्रात त्रुटी आढळल्याने तब्बल १३४६ सभासद अपात्र ठरले. या निर्णयामुळे महादेवराव महाडीक यांना जोरदार हादरा मानला जात आहे.