तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:17+5:302021-05-29T04:20:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे - महाराष्ट्र राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास नोव्हेंबर अखेरपर्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे - महाराष्ट्र राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास नोव्हेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली असून याबाबतचे शासन आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने आज निर्गमित करण्यात आला आहे.
मत्स्य व्यवसाय विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील मासेमारीकरिता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव, जलाशयांची चालू वर्ष सन २०२१-२२ ची तलाव ठेका रक्कम व इष्टतम मत्स्य बोटुकली संचयनाची १० टक्के आगाऊ रक्कम भरण्यासाठीची मुदत दि. ३१मे,२०२१ पासून पुढे सहा महिने (३० नोव्हेंबर २०२१) वाढविण्यात आली आहे. तसेच भाडेपट्टीने देण्यात आलेल्या मत्स्यबीज केंद्रांची चालू वर्षाची भाडेपट्टी रक्कम व पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धनासाठी १ टक्के व ०.५ टक्के क्षेत्र ठेक्याने दिलेल्या क्षेत्राची ठेका रक्कम भरण्यासाठीची मुदतही सहा महिन्यांनी वाढविण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात घोषित टाळेबंदीमुळे मच्छीमार, मत्स्य संवर्धक व मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आली नाही. तसेच उत्पादक मासळीची विक्री करण्यास पुरेसा वाव न मिळाल्यामुळे त्यांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मच्छीमार बांधवांना दिलासा देण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रतिक्रिया
गेली दोन वर्षे मासेमारी करण्याचा जो काळ असतो त्या एप्रिल-मे महिन्यात लॉकडाऊन पडले आहे. यामुळे मासेमारी व विक्री करतात न आल्याने मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी तलाव ठेक्यांची रक्कम भरण्यासाठी नोव्हेंबरअखेर मुदतवाढ दिल्याने दिलासा मिळाला आहे.
प्रा. एकनाथ काटकर (अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाचे महासचिव आणि प्रदेश काँग्रेसचे माजी सचिव )