पथदिव्यांचे सहा महिन्यांचे बिल थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:24 AM2021-03-19T04:24:18+5:302021-03-19T04:24:18+5:30
इचलकरंजी : येथील नगरपालिकेने इएसएसएल या केंद्रीय कंपनीचे सप्टेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या सहा महिन्यांचे भाडे भरले नाही. ...
इचलकरंजी : येथील नगरपालिकेने इएसएसएल या केंद्रीय कंपनीचे सप्टेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या सहा महिन्यांचे भाडे भरले नाही. या थकीत बिलांमुळे शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अनेक भागांत पथदिव्यांची समस्या निर्माण झाली आहे, अशी माहिती नगरसेवक शशांक बावचकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. इएसएसएल ही केंद्रीय कंपनी शहरात विद्युत खांबावर एलइडी बल्ब बसविण्याचे काम करते. या कंपनीशी नगरपालिकेने शहर व परिसरामध्ये एलइडी स्ट्रीट लाईट बसविण्यासह दुरुस्ती व देखभाल करण्यासाठीचा करार केला आहे. त्यानुसार कंपनीने पहिल्या टप्प्यात बसविलेल्या पथदिव्यांचे सहा महिन्यांचे भाडे आजतागायत भरलेले नाही. प्रत्येक महिन्याला पंधरा लाख २० हजार ७८० याप्रमाणे जवळपास ७६ लाख ३ हजार ९०० रुपयांचे बिल थकीत आहे. कंपनीकडून सातत्याने पालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत आहे; पण प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. अखेर कंपनीने हळूहळू देखभाल दुरुस्तीचे काम थांबविले आहे. त्यामुळे शहरातील बराचसा भाग अंधारात गेला आहे. कंपनीने पहिल्या टप्प्यात शहरातील विविध भागांत १३ हजार ६५२ एलईडी बल्ब बसविले आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात शहरातील वाढीव भागाचा विचार करता आणखीन १०५० एलईडी बल्ब मागणी करण्यात आली आहे. या टप्प्यातील काही प्रमाणात काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठीचा खर्च ६ वर्षासाठी सर्वसाधारण ८० लाख रुपये आहे. या कंपनीची बिले तातडीने अदा न केल्यास येत्या काही दिवसांत संपूर्ण शहर अंधारात जाण्याची भीती बावचकर यांनी व्यक्त केली आहे.