जिल्हाधिकाऱ्यांसह सहा अधिकारी घेणार लसीकरणाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:26 AM2021-03-16T04:26:15+5:302021-03-16T04:26:15+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने आता लसीकरणावर जोर देण्यात आला आहे. याचाच एक भाग ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने आता लसीकरणावर जोर देण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह सहा वरिष्ठ अधिकारी आता रोज जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा घेणार आहेत. तालुका संपर्क अधिकाऱ्यांकडून ते रोज माहिती घेणार असून, अधिकाधिक लसीकरण व्हावे यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
सध्या राज्यभर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यातही गेल्या पंधरा दिवसात ही संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून कोविड-१९ लसीकरणाच्या माध्यमातून ६० वर्षांवरील सर्व नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांसाठी लस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कोविड १० नियंत्रणासाठी लसीकरण हाच प्रभावी व मुख्य उपाय असल्यामुळे या व्यक्तींचे जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी लसीकरणाची गती वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यासाठी नियोजन केले असून, स्वत:सह सहा अधिकाऱ्यांकडे जिल्ह्याची आढाव्याची जबाबदारी दिली आहे. ज्येष्ठ आणि व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाच्या कामामध्ये या अधिकाऱ्यांनी त्या त्या तालुक्यांच्या संपर्क अधिकाऱ्यांशी समन्वय साधून अधिकाधिक लसीकरण करून घेण्याच्या लेखी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
चौकट
अ.न. नियुक्त समन्वय अधिकारी यांचे नाव पदनाम नेमून दिलेले तालुके/क्षेत्र
१ दौलत देसाई जिल्हाधिकारी शाहूवाडी, चंदगड
२ डॉ. कादंबरी बलकवडे प्रशासक महापालिका कोल्हापूर शहर
३ संजयसिंह चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कागल व गडहिंग्लज
४ किशोर पवार अप्पर जिल्हाधिकारी हातकणंगले व शिरोळ
५ अजयकुमार माने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पन्हाळा, गगनबावडा व करवीर ग्रामीण
६ आर. पी. शिवदास प्रकल्प संचालक आजरा, भुदरगड व राधानगरी
यंत्रणा
चौकट
लाभार्थी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या टक्केवारी
१ आरोग्य अधिकारी कर्मचारी ३१ हजार ८२० ८३ टक्के
२ फ्रंटलाइन वर्कर पंचायतराज विभाग १६ हजार ०९० ५४ टक्के
३ ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिक ८६०९ ६ टक्के
४ ६० वर्षांवरील नागरिक ५१,५७२ १५ टक्के