Kolhapur: पुराच्या पाण्यातून शेताकडे जाताना ट्रॅक्टर उलटला, एकाचा मृत्यू; दोघे बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 12:49 PM2024-08-02T12:49:56+5:302024-08-02T12:52:17+5:30
पाचजण सुदैवाने बचावले, बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू
कुरुंदवाड/ दत्तवाड : अकिवाट ( ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यातून जाताना ट्रॅक्टर उलटल्याने नऊजण बुडाले. एकाचा मृत्यू , एक गंभीर, तर दोघेजण बेपत्ता आहेत. अन्य पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास अकिवाट-बस्तवाड रस्त्यावर अकिवाट ओढ्यावर ही घटना घडली. सुहास पाटील (वय ५०, रा. अकिवाट) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरगदार व माजी सरपंच आण्णासाहेब हसुरे दोघेजण बेपत्ता आहेत, तर ट्रॅक्टरचालक रोहिदास माने गंभीर जखमी आहे.
एनडीआरएफ व रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी एकूण सात बोटींच्या साहाय्याने दिवसभर कृष्णा नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली होती. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, तहसीलदार अनिलकुमार हेळकर घटनास्थळी दाखल झाले होते.
आण्णासाहेब हसुरे यांची बस्तवाड रस्त्याला शेती असून, शेतात केळीचे पीक आहे. कृष्णा नदीच्या पुराचे पाणी या रस्त्यावर असल्याने हसुरे यांनी केळीचे घड काढण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये केळी तोडणीचे कामगार प्रदीप पाटील, अंगद मोहिते व अझहर मुजावर यांना घेऊन जात होते. ट्रॅक्टर असल्याने गावचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील, इकबाल बैरगदार, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रेणिक चौगुले, अरुण कोथळी ट्रॅक्टरमध्ये बसले, तर ग्रामपंचायत कर्मचारी अरुण कांबळे व सुहास माने चालकाला वाट दाखवत पुढे जात होते. पुलावर पुढे जात असताना पाण्याच्या प्रवाहाने ट्रॅक्टरचे चाक अलगद उचलल्याने ट्रॅक्टर उलटला.
यावेळी काहीजण पोहत काठावर आले तर काहीजणांना मच्छीमारांनी बाहेर काढले. तोंडात, नाकात पाणी गेल्याने सुहास पाटील व रोहिदास माने बेशुद्ध झाले होते. त्यांना उपचारासाठी नेत असताना पाटील यांचा मृत्यू झाला तर चालक माने याच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
२००५ च्या महापुरातील घटनेची पुनरावृत्ती
२००५ च्या महापुरात राजापूरमधील लोकांना बोटींच्या साहाय्याने बाहेर काढताना लष्करी बोट बुडाल्याने एका मुलासह दहा जणांचा मृत्यू झाला होता. याच परिसरात महापुराने पुन्हा एकदा दुर्घटना घडली आहे. त्यामुळे २००५ च्या महापुरातील घटनेची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा परिसरात होती.
बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू
बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी कृष्णा नदीत एनडीआरएफच्या तुकड्या, रेस्क्यू फोर्स, व्हाइट आर्मीचे जवान सात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने शोधमोहीम करत होते. मात्र सायंकाळपर्यंत त्यांना यश आले नव्हते.
अन् उपसरपंच थांबले
गावचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी मृत पाटील यांच्याबरोबर उपसरपंच आप्पासाहेब म्हैशाळेही जाणार होते. मात्र सकाळीच त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात गेल्याने या दुर्घटनेतून ते वाचले. त्यामुळे काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती याची प्रचिती त्यांना आल्याची गावात चर्चा आहे.