कार उलटून बेळगावचे सहाजण जखमी
By admin | Published: April 29, 2015 10:11 PM2015-04-29T22:11:46+5:302015-04-30T00:30:44+5:30
देवळेनजीक अपघात : आठवडाभरातील दुसरा अपघात
रत्नागिरी : रत्नागिरी- कोल्हापूर रस्त्यावरील देवळे जंगलवाडीजवळ (ता. संगमेश्वर) बुधवारी सकाळी एक मारूती गाडी उलटून एकाच कुटुंबातील सहाजण गंभीर जखमी झाले. सर्व जखमी कर्नाटकातील बेळगावजवळील देवेंद्रनगर येथील आहेत. त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
देवेंद्रनगरच्या परशुराम मदळी हे आपले कुटुंब घेऊन मारूती कारने बेळगावहून गोव्याला (केए-२२/एम ८४२२)ने गेले होते. तेथून ते गणपतीपुळे येथे गेले. बुधवारी सकाळी गणपतीपुळेहून ते कोल्हापूरमार्गे बेळगावला जाणार होते. सकाळी १०.१५ वाजता त्यांची कार देवळे जंगलवाडीजवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटले. गाडी उलटली व बाजूपट्टीवरून ४०० फूट फरफटत गेली. पुन्हा कोलांट्या घेत बांधावरून बाहेर गेली. कारमधील सर्वच्या सर्व ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती कळताच नाणीज येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली. त्यातून सर्व जखमींना देवळे प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार करण्यात आले. जखमींची गंभीर स्थिती लक्षात घेऊन नंतर त्यांना रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये परशुराम विठ्ठल मदळी (६५), चालक कपील परशुराम मदळी (३८), कांचन कपील मदळी (३०), पल्लवी परशुराम मदळी (५५), श्लोक परशुराम मदळी (८), स्पर्श कपील मदळी (१) यांचा समावेश आहे. अपघात अतिशय भीषण होता. त्यात कारचा चक्काचूर झाला आहे. सर्वांच्या डोक्याला मार लागला आहे. परशुराम व स्पर्श यांच्या डोक्याला अधिक मार लागला आहे.
करंजारी येथील विलास बेर्डे व त्यांच्या मित्रांनी अपघातातील जखमींना सहाय्य केले. आठवड्यात या भागातील झालेला हा दुसरा अपघात आहे. (प्रतिनिधी)