सहा दरोडेखोरांना पाठलाग करून पकडले
By Admin | Published: November 19, 2014 10:54 PM2014-11-19T22:54:47+5:302014-11-19T23:24:09+5:30
कोल्हापुरात कारवाई : दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : रात्रगस्त घालत असताना लक्ष्मीपुरी पोलिसांनी काल, मंगळवारी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून चटणीपूड, कुकरी, किल्ल्यांचा जुडगा, लहान बॅटरी, नायलॉनची दोरी, मोबाईल, तीन मोटारसायकली असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या सर्व दरोडेखोरांवर विविध पोलीस ठाण्यांत २७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्वांना आज, बुधवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.
चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी, आदी गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार कोल्हापूर शहरात एकत्र जमून दरोडा टाकणार आहेत, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस पथक पंचगंगा नदीघाट परिसरातून पाणंदीतून जगदगुरू शंकराचार्य मठाकडे जात असताना जलवाहिनीच्या पुलाखाली सहा तरुण अंधारात एकत्र थांबलेले दिसले. ते पोलिसांची गाडी पाहून पळून जाण्याचा प्रयत्नात असताना त्यांना पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दरोडा टाकण्यासाठी जात असल्याची कबुली दिली.
दरम्यान, अटक केलेल्यांमध्ये संशयित आकाश चंद्रकांत कांबळे (वय २१, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली), इर्शाद अल्ताफ बागवान (२४), पिंटू ऊर्फ अनिल प्रभाकर शिंदे (२६), दादू प्रभाकर शिंदे (२४, सर्व रा. यादवनगर), अविनाश अशोक हुलस्वार (२३, रा. रविवार पेठ), लखन ऊर्फ अनिल मोहन चौगुले (२५, रा. मारुती मंदिर, रामानंदनगर). (प्रतिनिधी)
विविध पोलीस ठाण्यांत २७ गु्हे दाखल
अटक केलेल्या या अट्टल दरोडेखोरांवर यापूर्वी शहरातील विविध पोलीस ठाण्यांत एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये संशयित आरोपी आकाश कांबळे याच्यावर घरफोडी, मोटारसायकल चोरीचे पाच, इर्शाद बागवानवर १९, तर दादू शिंदेवर दोन असे गुन्हे दाखल आहेत.