कोल्हापूर जिल्ह्यात सहा शाळा अनधिकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 04:53 PM2021-01-29T16:53:01+5:302021-01-29T16:54:48+5:30
School Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या सहा शाळा अनधिकृत आहेत. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी पालक आणि संबंधित संस्थाचालकांची असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जूनमध्येच जाहीर केले आहे. शासनाच्या नियमानुसार परवानगी न घेता काही शिक्षण संस्थांनी शाळा सुरू केल्या आहेत. त्यांच्या परवानगीच्या प्रस्तावांना शासनाकडून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अशा सहा शाळा अनधिकृत ठरल्या आहेत.
कोल्हापूर : जिल्ह्यात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या सहा शाळा अनधिकृत आहेत. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी पालक आणि संबंधित संस्थाचालकांची असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जूनमध्येच जाहीर केले आहे. शासनाच्या नियमानुसार परवानगी न घेता काही शिक्षण संस्थांनी शाळा सुरू केल्या आहेत. त्यांच्या परवानगीच्या प्रस्तावांना शासनाकडून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अशा सहा शाळा अनधिकृत ठरल्या आहेत.
शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, कागल, हातकणंगले, गडहिंग्लजमधील मराठी, इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते नववीच्या शाळांचा समावेश आहे. या शाळा सध्या सुरू आहेत. त्यामध्ये सुमारे १ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळा सुरू राहिल्यास बालकांचा मोफत व सक्तीचा कायदा अधिनियम २००९ नुसार कलम १८ (५) अंतर्गत दंड आकारण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिला आहे. दंड आणि कारवाई टाळण्यासाठी या शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची नोंद अन्य शाळांमध्ये केली आहे.
या शाळांना कारणे दाखवा नोटीस
सध्या जिल्ह्यात सहा शाळा अनधिकृत आहेत. शाळा, वर्ग सुरू करण्यासाठीच्या त्यांच्या परवानगीचे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहेत. शासनाकडून परवानगी मिळेपर्यंत या शाळांची अनधिकृत शाळा म्हणूनच नोंद राहणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची अन्य शाळेत नोंद
शासनाकडून परवानगी मिळेल याच्या प्रतिक्षेत संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. मात्र, या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी या शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची आपआपल्या परिसरातील जवळच्या शाळांमध्ये नोंद केली आहे. नोंद केलेल्या शाळांच्या माध्यमातून त्यांच्या परीक्षा घेतल्या जातात.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- सन २०१९-२० शैक्षणिक वर्षात अनधिकृत शाळा : ६
- सन २०२०-२१ शैक्षणिक वर्षात अनधिकृत शाळा : ६