भोसले कुटूंबातील सहाही बहिणी पोलीस दलात, वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्यास सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 05:35 PM2021-03-11T17:35:35+5:302021-03-11T17:36:34+5:30
Women's Day Special police girls kolhapur-मोठ्या बहिणीचा आदर्श घेत पाठोपाठ सहाजणी पोलिस खात्यात कर्तव्य बजावत असल्याची अतिशय दुर्मिळ उदाहरण पन्हाळा तालुक्यातील वाघवेपैकी खोतवाडी या छोट्याशा गावातील भोसले कुटूंबात पहायला मिळते. या सहाही बहिणी सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्य बजावत आहे. खासदार अमोल कोल्हे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडूनही कोल्हापूरच्या या लेकींची दखल घेतली गेली आहे.
सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे/पन्हाळा : मोठ्या बहिणीचा आदर्श घेत पाठोपाठ सहाजणी पोलिस खात्यात कर्तव्य बजावत असल्याची अतिशय दुर्मिळ उदाहरण पन्हाळा तालुक्यातील वाघवेपैकी खोतवाडी या छोट्याशा गावातील भोसले कुटूंबात पहायला मिळते. या सहाही बहिणी सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्य बजावत आहे. खासदार अमोल कोल्हे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडूनही कोल्हापूरच्या या लेकींची दखल घेतली गेली आहे.
प्राथमिक शिक्षक रंगराव भोसले पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी या अतिशय दुर्गम भागात राहतात. त्यांना सुरेश, चंद्रकांत, आणि प्रकाश हे तीन बंधू आहेत. सुरेश आणि चंद्रकांत हे गावाकडे शेती करतात. तर तिसरे प्रकाश भोसले हे कोल्हापूरात वास्तव्यास आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा आठवीत तर मुलगी खाजगी क्लासेस घेत आहे. सुरेश यांना चार मुली आणि दोन मुले तर, चंद्रकांत यांना तीन मुली आहेत.
पन्हाळगडाच्या पायथ्याला असलेल्या खोतवाडीसारख्या अतिशय दुर्गम भागात शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या या मुलींची परिस्थिती बेताची आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावात झाले. तर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना शेताच्या बांधावरून दोन किलोमीटर पायी चालत जात वाघवे येथे जावे लागत असे. पावसाळ्यात कधी-कधी गुडघाभर चिखलातून प्रवास करत या सहाजणींनी आपले शिक्षण पूर्ण केले.
मोठी सुवर्णा ही २००८ मध्ये पोलिस भरती झाली. आपल्या मोठ्या ताईची शिस्त आणि धाडस बघून बाकीच्या पाच बहिणीनी तिचा आदर्श घेत सात वर्षात पोलिस भरती झाल्या. आज एकाच कुटूंबातील या सहाही मुली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्य बजावत आहे. नकुशी असणाऱ्या पालकांसाठी त्या आज आदर्श बनल्या आहेत.
कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावात असलेल्या भोसले कुटुंबाने घरातील ६ मुलींना पोलीस सेवेत भरती करून देशसेवेचा वेगळाच आदर्श घालून दिला आहे. या सहाही मुलींसह भोसले कुटुंबाचे सामाजिक योगदान प्रेरणादायी आहे. pic.twitter.com/PHZa4u0X0Q
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 8, 2021
भोसले कुटुंबातील तिघा मुलांकडून सरकारी नोकरीची अपेक्षा होती, पण ती पूर्ण न झाल्याने, आजोबा रंगराव यांनी नातींच्या पाठीवर हात ठेवून त्यांना बळ दिले. त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळाल्याने या सहाही बहिणींनी पोलिस बनण्याची आपली महत्त्वकांक्षा पूर्णत्वास नेली. त्यांना कुटूंबासोबत वाघवे गावातील शिक्षकांचेही पाठबळ मिळाले.
माहेरचे आडनाव कायम
सुवर्णा (अस्वले), सोनाली (पाटील) या दोघी २००८ मध्ये भरती झाल्या, रूपाली (मुंगसे) २०१० मध्ये, सारिका (पाटील) २०१२ मध्ये तर विमल (साळोखे) २०१४ मध्ये भरती झाल्या. सर्वात धाकटी सुजाता२०१७ मध्ये भरती झाली. सुवर्णा सध्या कोल्हापुर पोलीस अधीक्षक कार्यालयात, सुजाता अलिबाग-रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात, रुपाली नाशिक शहर पोलीस, सोनाली कोल्हापूर राजवाडा पोलीस ठाण्यात, सारिका या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात आणि विमल या कोल्हापूर वाहतूक शाखेत सेवा बजावत आहे. विशेष म्हणजे या साऱ्या बहिणींनी आपले माहेरचे भोसले हे आडनावच लावलेले आहे.
पन्हाळा, कोल्हापूर येथील भोसले कुटुंबातील सहा मुली गरीबीवर मात करत कष्ट आणि जिद्दीने महाराष्ट्र पोलिस खात्यात सेवा बजावत आहेत.त्यांना प्रोत्साहन देणारे शिक्षक, पालकांसह सर्वांचे अभिनंदन.https://t.co/FoaVJd8k4t
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 8, 2021
अमोल कोल्हे, अनिल देशमुख यांनी ट्विटरवर केले कौतुक
अमोल कोल्हे यांनी पन्हाळा, कोल्हापूर येथील भोसले कुटुंबातील सहा मुली गरीबीवर मात करत कष्ट आणि जिद्दीने महाराष्ट्र पोलिस खात्यात सेवा बजावत आहेत.त्यांना प्रोत्साहन देणारे शिक्षक, पालकांसह सर्वांचे अभिनंदन अशा शब्दात ट्विटरवर या मुलींचे कौतुक केले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ट्विटरवर कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावात असलेल्या भोसले कुटुंबाने घरातील ६ मुलींना पोलीस सेवेत भरती करून देशसेवेचा वेगळाच आदर्श घालून दिला आहे. या सहाही मुलींसह भोसले कुटुंबाचे सामाजिक योगदान प्रेरणादायी आहे, अशी कौतुकाची थाप दिली आहे.