भोसले कुटुंबातील सहाही बहिणी पोलीस दलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:44 AM2021-03-13T04:44:35+5:302021-03-13T04:44:35+5:30

माजी प्राथमिक शिक्षक रंगराव भोसले पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी या अतिशय दुर्गम भागात राहतात. त्यांना सुरेश, चंद्रकांत, आणि प्रकाश हे ...

Six sisters from the Bhosle family joined the police force | भोसले कुटुंबातील सहाही बहिणी पोलीस दलात

भोसले कुटुंबातील सहाही बहिणी पोलीस दलात

Next

माजी प्राथमिक शिक्षक रंगराव भोसले पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी या अतिशय दुर्गम भागात राहतात. त्यांना सुरेश, चंद्रकांत, आणि प्रकाश हे तीन बंधू आहेत. सुरेश आणि चंद्रकांत हे गावाकडे शेती करतात, तर तिसरे प्रकाश भोसले हे कोल्हापुरात वास्तव्यास आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा आठवीत, तर मुलगी खासगी क्लासेस घेत आहे. सुरेश यांना चार मुली आणि दोन मुले तर, चंद्रकांत यांना तीन मुली आहेत.

पन्हाळगडाच्या पायथ्याला असलेल्या खोतवाडीसारख्या अतिशय दुर्गम भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या मुलींची परिस्थिती बेताची आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावात झाले, तर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना शेताच्या बांधावरून दोन किलोमीटर पायी चालत वाघवे येथे जावे लागत असे. पावसाळ्यात कधी-कधी गुडघाभर चिखलातून प्रवास करीत या सहाजणींनी आपले शिक्षण पूर्ण केले.

मोठी सुवर्णा ही २००८ मध्ये पोलीस भरती झाली. आपल्या मोठ्या ताईची शिस्त आणि धाडस बघून बाकीच्या पाच बहिणींनी तिचा आदर्श घेत सात वर्षांत पोलीस भरती झाल्या. आज एकाच कुटुंबातील या सहाही मुली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. नकुशी असणाऱ्या पालकांसाठी त्या आज आदर्श बनल्या आहेत.

भोसले कुटुंबातील तिघा मुलांकडून सरकारी नोकरीची अपेक्षा होती; पण ती पूर्ण न झाल्याने, आजोबा रंगराव यांनी नातींच्या पाठीवर हात ठेवून त्यांना बळ दिले. त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळाल्याने या सहाही बहिणींनी पोलीस बनण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्णत्वास नेली. त्यांना कुटुंबासोबत वाघवे गावातील शिक्षकांचेही पाठबळ मिळाले.

चौकट

माहेरचे आडनाव कायम

सुवर्णा (अस्वले), सोनाली (पाटील) या दोघी २००८ मध्ये भरती झाल्या, रूपाली (मुंगसे) २०१० मध्ये, सारिका (पाटील) २०१२ मध्ये, तर विमल (साळोखे) २०१४ मध्ये भरती झाल्या. सर्वांत धाकटी सुजाता २०१७ मध्ये भरती झाली. सुवर्णा सध्या कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात, सुजाता अलिबाग-रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात, रूपाली नाशिक शहर पोलीस, सोनाली कोल्हापूर राजवाडा पोलीस ठाण्यात, सारिका या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात आणि विमल या कोल्हापूर वाहतूक शाखेत सेवा बजावत आहे. विशेष म्हणजे या साऱ्या बहिणींनी आपले माहेरचे भोसले हे आडनावच लावलेले आहे.

Web Title: Six sisters from the Bhosle family joined the police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.