Kolhapur: ‘बाल संगोपन’मधील सहा हजारांवर बालके नियमित अनुदानापासून वंचित
By भीमगोंड देसाई | Published: September 11, 2024 01:17 PM2024-09-11T13:17:40+5:302024-09-11T13:18:07+5:30
एकल मुलांच्या पालकांची हेळसांड : सहा हजार बालके उपाशी
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन संगोपन योजनेतील लाभासाठी आतापर्यंत ८ हजार १६२ मुला, मुलींच्या पालकांनी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज केला आहे. यातील पात्र ठरलेल्या सहा हजार बालकांचे पालकही नियमित अनुदानापासून वंचित आहेत. दोन हजार १६२ अर्जदार मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. याचे पालक तालुका ते जिल्हा कार्यालयातील संबंधीत कार्यालयात वारंवार हेलपाटे मारत आहेत. शासनाचे काम आणि सहा महिने थांब असा अनुभव येत आहे.
विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडक्या बहिणीला दर महिने १५०० रूपये जमा करणारे शासन मात्र परिस्थितीमुळे अनाथपण आलेल्या बालकांना मात्र दर महिने २२५० रूपये निर्वाह भत्ता देण्यासाठी टाळटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे.
अर्ज केल्यानंतर जिल्हयाच्या ठिकाणी बालकल्याण समितीसमोर मुलांना समक्ष नेऊन पडताळणी करून घ्यावी लागते. योजनेतील अर्जदारांची गृहचौकशी होते. विविध टप्यातील प्रक्रियेसाठी प्रचंड विलंब होत आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून पात्र ठरल्यानंतर नियमितपणे लाभाची रक्कम मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. सुमारे १४०० पेक्षा अधिक पात्र मुलांना जुलै २०२३ पासून अनुदान जमा झालेले नाही. उर्वरित मुलांचे मार्च मार्च २०२४ पासून अनुदान मिळालेले नाही.
मोबाईल उचलत नाही, कार्यालयात भेटत नाहीत..
महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हयाचे कार्यालय मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये आहे. तेथील प्रमुख अधिकारी सुहास वाईंगडे कार्यालयात भेटत नाहीत आणि मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर रिसीव्ह करीत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. असे बेभरोशाचे अधिकारी महिला, बालकाचे काय कल्याण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लाभ कोणाला मिळू शकतो ?
- शून्य ते १८ वर्षे वयोगटातील अनाथ, पालकांचा पत्ता लागत नाहीत असे किंवा दत्तक देणे शक्य नसलेले बालक.
- एक पालक असलेले बालके.
- कुटुंबातील न्यायालयीन वाद, तंटे, वादविवादामुळे बाधीत झालेले बालके.
- कुष्ठरोग, जन्मठेपची शिक्षा भोगत असलेले वडीलांची, एचआयव्ही किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या पालकांची मुले.
- दोन्ही पालक दिव्यांग असलेल्यांची मुले.
शासनाकडून अनुदान आल्यानंतर लाभार्थींच्या खात्यावर जमा केले जाते. निधी मिळण्यात अनियमितता असल्याने संगोपनाचे अनुदान देता आले नाही. लोकांना भेटण्यासाठी मी नेहमी कार्यालयात असतो. लोकांच्या तक्रारी ऐकून घेतो. -सुहास वाईंगडे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, कोल्हापूर.