सलग ५० दिवस गरजूंना सहा हजार जेवणाची पॅकेट्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:15 AM2021-07-03T04:15:43+5:302021-07-03T04:15:43+5:30
कळंबा : कोरोनाच्या संकटात ‘एक घास भुकेलेल्यासाठी’ उपक्रमअंतर्गत गरजूंना सलग ५० दिवस सहा हजारांहून अधिक फूड पॅकेट्स वाटप करण्याचा ...
कळंबा : कोरोनाच्या संकटात ‘एक घास भुकेलेल्यासाठी’ उपक्रमअंतर्गत गरजूंना सलग ५० दिवस सहा हजारांहून अधिक फूड पॅकेट्स वाटप करण्याचा विधायक उपक्रम मैत्री फाउंडेशनच्या वतीने सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत उपक्रमात सातत्य ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. प्रभाग क्रमांक ७९ सुर्वेनगरातील विधायक समाजकार्यासाठी धडपडणाऱ्या युवकांनी एकत्र येत मैत्री फाउंडेशनची स्थापना केली. कोणताही गाजावाजा न करता बरेच समाजविधायक उपक्रम परिसरात राबवले. १४ मे पासून सुरवातीला २२ फूड पॅकेट्स वाटप करीत उपक्रमाला सुरवात झाली आणि आजअखेर सातत्याने तीनशेहून अधिक फूड पॅकेट्सचे दररोज वाटप होत आहे. सीपीआर, रस्त्यावर कर्तव्यपार पाडणारे प्रशासनातील कर्मचारी, फिरस्ते, गरजूंना न चुकता जेवणाच्या डब्याच्या स्वरूपात मदत केली जात आहे.
मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत शिंदे, सदस्य सुनील वर्मा, लखन चव्हाण, संतोष संनगर, संजय अकोळकर,शामराव चव्हाण, रमेश जाधव व क्रियाशील सदस्य यांच्या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात दिल्याने आजही अविरतपणे उपक्रम क्रियाशीलपणे सुरू आहे.
फोटो : ०२ कळंबा मदत
कोरोना संकटाच्याकाळात १४ मेपासून आजअखेर सातत्याने दररोज जेवणाचे फूड पॅकेट्स गरजूंना वाटप करणारी सुर्वे नगरातील मैत्री फाउंडेशनची टीम.