‘फर्स्ट फ्लाईट’ ने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:09 PM2018-04-09T17:09:53+5:302018-04-09T17:13:04+5:30
सहा वर्षांनंतर आता कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या फर्स्ट फ्लाईटने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक आहेत. आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि रविवारी ‘कोल्हापूर-मुंबई’ अशी विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून पुरविली जाणार आहे.
कोल्हापूर : सहा वर्षांनंतर आता कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या फर्स्ट फ्लाईटने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक आहेत. आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि रविवारी ‘कोल्हापूर-मुंबई’ अशी विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून पुरविली जाणार आहे.
धावपट्टीची दुरुस्ती, नागरी वाहतुकीचा परवाना, आदी कारणांमुळे गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेल्या कोल्हापूरच्या विमानसेवा प्रारंभाचा दि. २२ एप्रिल हा मुर्हूत निश्चित झाला आहे. एअर डेक्कन कंपनीने रविवारी (दि. ८) घेतलेल्या विमान उड्डाणाच्या चाचणीमुळे या मुर्हूतावर शिक्कामोर्तब झाला.
‘उडान’ योजनेअंतर्गत ‘एअर डेक्कन’कडून कोल्हापूर-मुंबई अशी विमानसेवा मंगळवार, बुधवार आणि रविवारी पुरविली जाणार आहे. यासाठी १८ आसनी विमान आहे. यातील पहिल्या नऊ आसनांसाठी ‘उडान’ अंतर्गत १९७० रुपये तिकीट दर आहे. उर्वरीत जागांसाठी तीन ते साडेतीन हजार रुपये तिकीट दर असणार आहे.
तिकीटाची नोंदणीची प्रक्रिया आॅनलाईन आहे. ‘एअर डेक्कन’च्या संकेतस्थळावर जावून नोंदणी करावयाची आहे. कोल्हापूरमधून मुंबईला टेकआॅफ करणाऱ्या पहिल्या विमानामध्ये बसण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. त्यासाठी तिकीट नोंदणीकरिता चांगला प्रतिसाद आहे.
एअर डेक्कनने त्यांच्या संकेतस्थळावर कोल्हापूर-मुंबई विमानसेवेची माहिती गेल्या चार दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली. दरम्यान, कोल्हापूर विमानतळावर रविवारी एअर डेक्कनने विमान उड्डाणाची चाचणी घेतली. आणखी चार दिवस ही चाचणी केली जाणार आहे.
सांताक्रूझ टर्मिनसवर उतरणार विमान
मुंबईतून दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी सुटणारे विमान कोल्हापुरमध्ये २ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. कोल्हापुरातून ३ वाजून ५ मिनिटांनी सुटणारे विमान मुंबई येथे ४ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. मुंबईमध्ये सांताक्रूझ विमानतळावरील टर्मिनस वन-ए येथे कोल्हापूरहून जाणारे विमान उतरणार आहे.
विमानसेवा सुरू होणार असल्याने कोल्हापूरचा एक महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. कोल्हापूरच्या पर्यटन, औद्योगिक, शिक्षण, कला-सांस्कृतिक आदी क्षेत्रातील विकासाला गती मिळणार आहे. मुंबई-कोल्हापूर प्रवासासाठीचा वेळ वाचणार आहे.
-समीर शेठ, सदस्य,
कोल्हापूर विमानतळ सल्लागार समिती
विमानसेवा सुरू होणार असल्याने कोल्हापूरला खूप फायदा होणार आहे. उद्योग-व्यवसाय, वैद्यकीय सेवा-सुविधा, शिक्षण, पर्यटन आदी क्षेत्रांमध्ये विकासाची पाऊले निश्चितपणे पडणार आहेत. कोल्हापूर-मुंबई विमानसेवेच्या तिकीट नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद आहे.
- बी. व्ही. वराडे,
विभागीय व्यवस्थापक, ट्रेड विंग्ज् लिमिटेड