सहापदरीकरण २७ महिन्यांत होणार
By admin | Published: August 17, 2016 12:25 AM2016-08-17T00:25:37+5:302016-08-17T00:25:59+5:30
नम्रता रेड्डी : कागल-सातारा मार्गावर रिटर्न टोल प्रस्तावित; २४२३ कोटी खर्च अपेक्षित
सतीश पाटील -- शिरोली पुणे-बंगळूर महामार्गावरील कागल-सातारा या १३३ किलोमीटर रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम २७ महिन्यांत पूर्ण करून हा रस्ता २०१९ मध्ये वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ करीत आहे. हा रस्ता ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर होणार असल्याचे कार्यकारी अधिकारी नम्रता रेड्डी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सहापदरीकरणासाठी सुमारे २४२३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, भूसंपादनामुळे यामध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकारी आणि अभियंत्यांनी सहापदरीकरणाचा नियोजित आराखडा रस्ते आणि प्रादेशिक परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर पुणे येथील नुकत्याच झालेल्या बैठकीत सादर केला आहे. या आराखड्याला मंजुरी मिळाली असून, डिसेंबरअखेर निविदा निघून एप्रिल २0१७ मध्ये रस्त्याचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. चौपदरीकरण करतानाच बहुतांश भूसंपादन करण्यात आले असून, काही ठिकाणी पुन्हा भूसंपादन अपेक्षित आहे.
सहापदरीकरणाच्या प्रस्तावित कामात पंचगंगा नदी, वारणा नदी, घुणकी, कुरमोडी, तारली या ठिकाणी मोठे पूल बांधण्याचा समावेश आहे. तर ढेबेवाडी फाटा, कऱ्हाड, वारंजी, कोयना, नेर्ली, वाघवाडी फाटा, वाठार, नागाव फाटा, सांगली फाटा, लक्ष्मी टेकडी, कागल या ठिकाणी नवे उड्डाण पूल उभारण्यात येणार आहेत. याशिवाय टोप, अंबप यासह बारा मोठे भुयारी मार्ग उभारले जातील.
स्थानिक वाहतूक महामार्गावर येऊन अपघात होऊन जीवित हानी होऊ नये, यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला पाच फुटांपासून १५ फुटांपर्यंत संरक्षक कठडे घातले जाणार आहेत. त्यामुळे पादचारी रस्त्यावर येता येणार नाही. महामार्गालगतची मोठी गावे, शाळा, तसेच रहदारीच्या ठिकाणी हवाई पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. यात कऱ्हाड, टोप, शिरोली या ठिकाणांचा समावेश आहे.
सहापदरीकरणाचे काम बीओटी तत्त्वावर २७ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर या रस्त्यावर टोलवसुली होणार आहे. पण सध्या महाराष्ट्रातच चौपदरीकरण झाल्यावर रिटर्न टोल मिळत नाही. शेजारच्या कर्नाटक राज्यात रिटर्न आहे. त्यामुळे रेड्डी यांनी सहापदरीकरणाच्या प्रस्तावात रिटर्न टोलचे नियोजन केले आहे; पण मंजूर होणार की नाही, हे अद्यापही निश्चित नाही. पुणे-सातारा सहापदरीकरणासाठी ज्या प्रमाणात टोल आकारणी होईल, त्याच प्रमाणात इथेही टोल आकारणी होईल.
दरम्यान, या कामासाठी २४०० कोटी रुपये मंजूर करण्याचे नियोजन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत करण्यात आले. बैठकीला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते.
या रस्त्याचे टेंडर निघाल्यानंतर तत्काळ कामाला सुरुवात होईल, असे नम्रता रेड्डी यांनी सांगितले.
प्रत्येक लेन साडेदहा मीटर
सध्याचा महामार्गाच्या दोन्ही बाजूचे रस्ते प्रत्येकी सात मीटरचे आहेत. सहापदरीकरणानंतर त्यामध्ये साडेतीन मीटरनी वाढ होऊन हा रस्ता प्रत्येकी साडेदहा मीटरचा होणार आहे. सहापदरीकरण करण्यात येणाऱ्या १३३ किलोमीटरच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी सात मीटरचे सेवामार्ग असतील. या सेवामार्गावरूनच स्थानिक वाहतूक होईल. तसेच सेवामार्गाशेजारी दोन्ही बाजूला दोन मीटरचे पादचारी मार्ग बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे पादचारी सेवामार्गावर येणार नाहीत.