मालगाडीचे सोळा डबे घसरले

By admin | Published: April 22, 2015 11:28 PM2015-04-22T23:28:49+5:302015-04-23T00:05:11+5:30

आदर्कीनजीक अपघात : पुणे-मिरज मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प

Sixteen coaches of the goods were dropped | मालगाडीचे सोळा डबे घसरले

मालगाडीचे सोळा डबे घसरले

Next

आदर्की : पुणे-मिरज लोहमार्गावर आदर्की आणि वाठार रेल्वे स्थानकांदरम्यान बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास मिरजेकडून साखर घेऊन पुण्याकडे जाणाऱ्या मालगाडीचे १६ डबे घसरले. सात डबे रुळापासून चाळीस फूट भरावावरून खाली कोसळले, तर उर्वरित डबे दगडी भिंतीला धडकले. तीनशे मीटर रेल्वे रुळाच्या सिमेंट स्लीपरचे तुकडे झाले. दरम्यान, या अपघातामुळे
पुणे-मिरज मार्गावरील सर्व गाड्या बुधवारी रद्द करण्यात आल्या.
पुण्यापासून ११० किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. या भीषण अपघातामुळे अडीचशे मीटर अंतरावरील रूळ उखडले, तर सुमारे दोनशे स्लीपरचा अक्षरश: चुरा झाला. साखरेने भरलेले सहा डबे रूळ सोडून भरावावरून चाळीस फूट खोल (पान ८ वर)


जाऊन भरावाच्या मातीत सात फूट रुतून बसले. अपघातस्थळ आदर्की गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी सात वाजता वाठार स्टेशन रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रुळावरून घसरलेले डबे वगळता बाकीचे डबे दोन्ही बाजूंनी सोडवून वेगळे काढण्यात आले. ते आदर्की आणि वाठार स्थानकांवर सुरक्षितपणे नेण्यात आले. अपघातामुळे या मार्गावरील रूळ तुटून बाजूला गेले होते. त्यामुळे हा मार्ग खडीकरण केलेल्या रस्त्याप्रमाणे दिसत होता.
रल्वे अपघात जोड-एक्स्प्रेस गाड्या कुर्डूवाडीमार्गे वळवल्या
मिरज : साताऱ्याजवळ मालगाडी रुळावरून घसरल्याने बुधवारी मिरज ते पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. गांधीधाम, अजमेर, निजामुद्दीन, धनबाद, संपर्कक्रांती, महालक्ष्मी, सह्याद्री, चालुक्यसह सर्व एक्स्प्रेस गाड्या कुर्डूवाडीमार्गे वळविण्यात आल्या. कोयना एक्स्प्रेससहपॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.
कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस व मुंबईतून कोल्हापूरला येणारी कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. कोल्हापूर-पुणे पॅसेंजर साताऱ्यापर्यंत सोडण्यात आली. सकाळी दहानंतर मिरज-पुणे मार्गावर लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या मोठ्या संख्येने असल्याने येणाऱ्या व जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडीमार्गे वळविण्यात आल्या. गांधीधाम-बेंगलोर एक्स्प्रेस (क्र. १६५०५), लोकमान्य टिळक टर्मिनस - हुबळी एक्स्प्रेस (क्र. १७३१८), चंदीगड-यशवंतपूर एक्स्प्रेस (क्र. २२६८६), धनबाद-कोल्हापूर एक्स्प्रेस (क्र. ११०४६), निजामुद्दीन-गोवा एक्स्प्रेस (क्र. १२७८०), बेंगलोर-अजमेर एक्स्प्रेस (क्र. १६२१०), यशवंतपूर-निजामुद्दीन (क्र. १६६२९) संपर्कक्रांती एक्स्प्रेस कुर्डूवाडीमार्गे वळविण्यात आल्या. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यातून पाठविण्यात आली. कोल्हापूरला येणारी गोदिंया एक्स्प्रेस पुण्यातच थांबविण्यात आली. मिरजेतून पुण्यापर्यंत जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या साताऱ्यात थांबविण्यात आल्या. मिरजेतून रात्री मुंबईला जाणाऱ्या चालुक्य एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, स'ाद्री एक्स्प्रेस पंढरपूर-कुर्डूवाडीमार्गे पाठविण्यात आल्या. कुर्डूवाडीमार्गे तब्बल तीन तास उशिरा रेल्वेगाड्या धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या कुर्डूवाडी, दौंडमार्गे पुण्यावरून मुंबईकडे जात असल्याने रखडल्या होत्या. गुरुवारी दुपारपर्यंत रेल्वेमार्गाची दुरुस्ती सुरू राहणार असल्याने मुंबईतून येणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस कुर्डूवाडी-पंढरपूरमार्गे मिरजेला येणार आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत मिरज-पुणे मार्गावरील वाहतूक सुरळीत होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मदतकार्य युद्धपातळीवर
सकाळी दहा वाजता मिरजहून मदत पथक, एक मोठी व दोन छोट्या क्रेन, तीन जेसीबी आणण्यात येऊन मदतकार्य युद्धपातळीवर सुरू झाले. दुपारी बारा वाजता दौंडहून दुसरे मदत पथक मोठ्या क्रेनसह दाखल झाले आणि अपघातग्रस्त डबे हटविण्याच्या कामाला वेग आला.
हे डबे साखरेच्या पोत्यांनी भरले होते. ते रिकामे करण्यासाठी लोणंद व सातारा येथून तीनशे हमाल आणण्यात आले. त्यांनी आठ डब्यांतील साखर उतरविल्यानंतर या डब्यांचा काही भाग गॅस कटरने कापून क्रेनद्वारे दूर करण्यास प्रारंभ झाला. चार वाजेपर्यंत या कामाला यश आले.

तिकिटे रद्दची व्यवस्था
रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याने, तसेच काही गाड्या वळविण्यात आल्याने आरक्षित रेल्वे तिकिटे रद्द केल्यास प्रवाशांना पूर्ण पैसे परत देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिरज व कोल्हापुरात जादा खिडकी सुरू करून प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत देण्यात आले.

Web Title: Sixteen coaches of the goods were dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.