कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर सोळा लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:31 PM2018-10-28T23:31:55+5:302018-10-28T23:32:00+5:30
कोल्हापूर : गगनबावडा गावच्या हद्दीत विदेशी मद्याची वाहतूक करणारा आयशर टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रविवारी पकडला. ...
कोल्हापूर : गगनबावडा गावच्या हद्दीत विदेशी मद्याची वाहतूक करणारा आयशर टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रविवारी पकडला. यावेळी टेम्पोची झडती घेतली असता, १६ लाख किमतीचा मद्यसाठा मिळून आला. पथकाने मद्यसाठ्यासह टेम्पो, असा सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी टेम्पोचालक तन्वीर इकबाल शेख (वय २९, रा. न्यू सालेवाडा, गणेशनगर, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला अटक केली.
गोव्याहून चोरटी विदेशी मद्याची तस्करी वाढू लागल्याने जिल्ह्याच्या सीमारेषेवर ‘उत्पादन शुल्क’च्या भरारी पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू आहे. निरीक्षक एस. एस. साळवे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, जवान सुहास वरुटे, जयसिंग खुटावळे, सुखदेव सिद, मोहन पाटील, दिलीप दांगट, प्रसाद माळी, नितीन ढेरे हे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी एमटीडीसी रिसोर्टच्या समोर टेम्पो (एम. एच. ४३ वाय ५१६१) पकडला. टेम्पोच्या पुढील बाजूस विशिष्ट प्रकारचा कप्पा करून मद्याचे २१० बॉक्स ठेवले होते. त्याचा भाव १६ लाख रुपये आहे. चालक शेख हा मद्यसाठा कोणाला देणार होता? यासंबंधी चौकशी सुरू आहे.