सायझिंग संपाबाबतचा तोडगा दृष्टिक्षेपात
By admin | Published: September 8, 2015 11:41 PM2015-09-08T23:41:51+5:302015-09-08T23:41:51+5:30
राजू शेट्टी, प्रकाश आवाडे यांची माहिती : सायझिंगधारक, कामगार संघटना या दोघांचीही भूमिका सकारात्मक
इचलकरंजी : सायझिंग कामगारांच्या संपाबाबतचा तोडगा दृष्टिक्षेपात आला असून, सायझिंगधारक व कामगार संघटना सकारात्मक आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचा ५०० रुपयांचा वेतनवाढीचा तोडगा सायझिंगधारक कृती समितीने मान्य केला आहे, तर कामगार संघटनेची मागणी ७०० रुपयांची आहे. त्यामुळे संप आता निर्णायक वळणावर आला आहे, अशी माहिती खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पत्रकारांना दिली.
यंत्रमाग उद्योगातील सुधारित किमान वेतनाबाबत विचारविनिमय करून पुढील दिशा ठरविण्यासाठी यंत्रमागधारकांच्या पाचही संघटनांनी खासदार राजू शेट्टी यांना पाचारण केले होते. इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनच्या कार्यालयात या बैठकीस खासदार शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे सतीश कोष्टी, राजगोंड पाटील, सागर चाळके, यंत्रमागधारक जागृती संघटनेचे विनय महाजन, जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे दीपक राशिनकर, पॉपलीन यंत्रमागधारक संघटनेचे सचिन हुक्कीरे, राष्ट्रवादी पॉवरलूम असोसिएशनचे विश्वनाथ मेटे, नारायण दुरुगडे, आदी उपस्थित होते.
सुधारित किमानवेतन अन्य राज्यांपेक्षा अधिक असल्याने ते येथील यंत्रमाग उद्योगाला घातक ठरत आहे. त्यामुळे शासन स्तरावर किमान वेतन बदलासाठी व ते उत्पादनाशी निगडित ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न व्हावेत; अन्यथा राज्यातील यंत्रमाग उद्योग मोडकळीस येईल, असे म्हणणे यंत्रमागधारक प्रतिनिधींनी यावेळी मांडले. यावर शेट्टी यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले, तर आवाडे यांनी किमान वेतन बदलासाठी शासनाकडे केलल्या पाठपुराव्याची माहिती दिली.
आवाडे यांनी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेचे नेते ए. बी. पाटील यांना बैठकीचे निमंत्रण दिले. त्यानंतर समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात खासदार शेट्टी व माजी मंत्री आवाडे यांनी कामगार संघटनेचे पाटील, सुभाष निकम, कृष्णात कुलकर्णी यांच्यासह सर्व संघटना पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. सुमारे अर्धा तास ही बैठक चालली.
खासदार शेट्टी व आवाडे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीनंतर सायझिंग कामगारांचा संप मिटविण्यासाठी अनेक घडामोडी झाल्या. त्यामुळे सायझिंगधारक कृती समितीने कामगारांना वेतनवाढ देण्याविषयी व कामगार संघटनांनी कामगारांसाठी तात्पुरती वेतनवाढ घेऊन कारखाने सुरू करण्याचा केला आहे. येत्या दोन-चार दिवसांत चर्चा होऊन सायझिंग कारखाने सुरू होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
नवे वस्त्रोद्योग धोरण लवकरच : पाटील
कोल्हापूर : राज्यातील वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर करेल, अशी माहिती पालकमंत्री तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. वस्त्रोद्योगांना किती भागभांडवल द्यायचे, विजेचे दर किती ठेवायचे, अशा विविध अंगानी अभ्यास करून धोरणांत समावेश केला जाईल. अमरावतीच्या धर्तीवर राज्यात ठिकठिकाणी मेगा कॉम्प्लेक्स उभारली जातील. ज्यामध्ये कच्चा माल आल्यापासून तयार कपड्यांपर्यंतची उत्पादने अशा ‘मेगा कॉम्प्लेक्स’मधून होतील, असे पाटील म्हणाले. अनेक सूतगिरण्या आर्थिक अडचणीत आहेत. कर्जाच्या खाईत सापडल्या आहेत. या सूतगिरण्यांच्या मालकांना जमिनी विकण्याचे अधिकार देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, सूतगिरण्या सुस्थितीत येतील अशी अपेक्षा असल्याचे पाटील म्हणाले.
सायझिंग कामगारांनी सुरू केलेल्या संपाचा मंगळवारी ५० वा दिवस होता. दिवसभरामध्ये सायझिंग कामगारांचा मेळावा, सायझिंगधारक कृती समितीने सहायक कामगार आयुक्तांना दिलेले निवेदन आणि खासदार शेट्टी व माजी मंत्री आवाडे यांनी बैठक घेऊन कामगार संघटनेशी केलेली चर्चा अशा सकारात्मक घटना घडल्या. त्यामुळे शहरातील औद्योगिक क्षेत्रात विक्रमी ठरणारा हा संप संपुष्टात येण्यासाठी कोंडी फुटण्यास सुरुवात झाल्याची चर्चा येथील उद्योजकांमध्ये होती.
कामगारांनी कमाल माप पदरात घेऊन सायझिंग सुरू करावेत
कामगार मेळाव्यात नेत्यांचे आवाहन
इचलकरंजी : सायझिंग कारखान्याच्या परिस्थितीनुसार वेतनवाढ देण्याची क्षमता बदलत जाते. म्हणून कामगारांनी सातशे रुपये आणि त्याहून वेतनवाढ देणाऱ्या सायझिंगधारकांबरोबर चर्चा करून वेतनवाढीचे कमाल माप पदरात घ्यावे आणि सायझिंग कारखाने सुरू करावेत, असे आवाहन मंगळवारी कामगारांच्या मेळाव्यात केले.
सायझिंग कामगारांचा मेळावा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला. त्या मेळाव्यामध्ये कामगार नेते ए. बी. पाटील, सुभाष निकम, मुमताज हैदर, चंद्रकला मगदूम, कृष्णात कुलकर्णी, आदींची भाषणे झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीचा ऊहापोह करण्यात आला.
शनिवारच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढताना अचानकपणे ५०० रुपयांचा प्रस्ताव ठेवला. त्याऐवजी कामगारांना किमान किती घेणे परवडते आणि सायझिंगधारकांना कमाल किती देणे परवडते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी विचारावयास पाहिजे होते, असेही यावेळी वक्त्यांनी सांगितले.
दरम्यान, संप काळात वेतन न मिळाल्याने कामगारांना आर्थिक टंचाई भासत आहे. त्यासाठी मदत फेरी काढण्यात आली. त्यामध्ये सुमारे एक लाख रुपयांची रोख रक्कम व १६ क्विंटल धान्य जमा झाले आहे. त्यामधील काही रक्कम व जोंधळे, गहू, व तांदूळ असे धान्य गरजवंत कामगार कुटुंबांना वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)
५०० रुपये वाढ देण्याची तयारी
सायझिंगधारक कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी अमित सैनी यांचा ५०० रुपये वाढीचा प्रस्ताव आम्हाला मान्य आहे. उच्च न्यायालयात होणाऱ्या निर्णयाला अधीन राहून आम्ही वेतनवाढ देऊन कारखाने चालू करण्यास तयार आहोत. मात्र, कामगार संघटनेने सुरू केलेला संप जाहीरपणे मागे घ्यावा, असे म्हटले आहे. यावेळी संतोष कोळी, प्रकाश गौड, दिलीप ढोकळे, वसंतराव पाटील, आदी उपस्थित होते.
५०० रुपये वाढ देण्याची तयारी
सायझिंगधारक कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी अमित सैनी यांचा ५०० रुपये वाढीचा प्रस्ताव आम्हाला मान्य आहे. उच्च न्यायालयात होणाऱ्या निर्णयाला अधीन राहून आम्ही वेतनवाढ देऊन कारखाने चालू करण्यास तयार आहोत. मात्र, कामगार संघटनेने सुरू केलेला संप जाहीरपणे मागे घ्यावा, असे म्हटले आहे. यावेळी संतोष कोळी, प्रकाश गौड, दिलीप ढोकळे, वसंतराव पाटील, आदी उपस्थित होते.