सायझिंग उद्यापासून सुरू होण्याची चिन्हे

By admin | Published: September 10, 2015 12:56 AM2015-09-10T00:56:51+5:302015-09-10T00:56:51+5:30

किमान वेतन प्रश्न : बोलणी निर्णायक वळणावर

Sizing signs to start from tomorrow | सायझिंग उद्यापासून सुरू होण्याची चिन्हे

सायझिंग उद्यापासून सुरू होण्याची चिन्हे

Next

इचलकरंजी : सायझिंग कामगारांच्या संपाबाबत खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे व कामगार नेते ए. बी. पाटील यांच्यात झालेल्या चर्चेमुळे संपाची कोंडी फुटून बुधवारी दिवसभरात वीस कारखान्यांवर मालक व कामगारांमध्ये बोलणी झाली. अशा पार्श्वभूमीवर गेले ५१ दिवस बंद असलेले सायझिंग कारखाने शुक्रवार (दि. ११) पासून मोठ्या प्रमाणावर सुरू होण्याची चिन्हे आहेत.
यंत्रमाग कामगारांना शासनाने जाहीर केलेले सुधारित किमान वेतन मिळण्याच्या मागणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने
२१ जुलैपासून बेमुदत संप सुरू केला आहे. कामगारांच्या संपामध्ये तोडगा काढण्यासाठी कामगारमंत्री प्रकाश मेहता व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सायझिंगधारक व कामगार संघटना यांच्या मुंबईत बैठका घेतल्या. जिल्हाधिकारी अमित सैनी व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी कोल्हापूर व इचलकरंजी येथे बैठका आयोजित केल्या होत्या. अशाच बैठका प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे व सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी घेतल्या. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना निर्णायक यश आले नव्हते.
संप लांबत चालल्यामुळे आगामी गणेश चतुर्थी व बकरी ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये अशांतता माजवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ५ सप्टेंबरला जिल्हाधिकारी सैनी व जिल्हा पोलीस अधीक्षक शर्मा यांनी येथील राजीव गांधी भवनमध्ये शहरातील
आजी-माजी लोकप्रतिनिधी, यंत्रमाग उद्योगाशी निगडित असलेल्या संघटना व सायझिंगधारक आणि कामगार संघटना यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीमध्ये अडीच तासांच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर जिल्हाधिकारी सैनी यांनी उच्च न्यायालयामध्ये असलेल्या याचिकेवरील निकालाला आधीन राहून कामगारांना ५०० रुपये वाढ द्यावी आणि कारखाने सुरू करावेत, असा प्रस्ताव दिला होता. तरीही संपाची कोंडी फुटली नाही.
मंगळवारी खासदार शेट्टी हे येथील पॉवरलूम असोसिएशनमध्ये आले असताना त्यांच्यात व माजी मंत्री आवाडे यांच्यामध्ये चर्चा होऊन कामगार नेते पाटील यांच्याबरोबर बैठक घेण्याचे ठरले. समाजवादी प्रबोधिनीमध्ये सायंकाळी झालेल्या बैठकीमध्ये कारखाना स्थळावर कामगारांना निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आणि सायझिंग कारखाने सुरू करावेत, असे ठरले. याला बुधवारी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सुमारे वीस-बावीस सायझिंग कारखान्यांवर कामगार व सायझिंगधारक यांच्यामध्ये चर्चा झाली. याला दुजोरा देण्यात आला. त्यामुळे नजीकच्या दोन-तीन दिवसांत चर्चा झालेल्या ठिकाणचे सायझिंग कारखाने सुरू होतील. यालाच अनुसरून अन्य सायझिंगमध्ये सुद्धा चर्चा करून ते कारखाने मोठ्या संख्येने सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
गरजवंत कामगार कुटुंबीयांना धान्य वाटप
बुधवारी थोरात चौकामध्ये सायझिंग कामगारांचा मेळावा झाला. मेळाव्यामध्ये कामगार नेते पाटील, सुभाष निकम, कृष्णात कुलकर्णी, आदींची भाषणे झाली. त्यावेळी मंगळवारी समाजवादी प्रबोधिनीमध्ये झालेल्या खासदार शेट्टी व माजी मंत्री आवाडे यांच्या बैठकीतील वृत्तांत सांगण्यात आला. तसेच मदत फेरीतून जमलेले आणि कागल पंचतारांकित वसाहतीमधून मिळालेले धान्य व निधी यांचे गरजवंत कामगारांच्या कुटुंबीयांना वाटप करण्यात आले.(प्रतिनिधी)

Web Title: Sizing signs to start from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.