नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण शिक्षण द्या

By admin | Published: June 27, 2016 01:13 AM2016-06-27T01:13:19+5:302016-06-27T01:14:12+5:30

देवेंद्र फडणवीस : शिवाजी विद्यापीठातील व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन; वृत्तपत्र विद्या विभागाच्या इमारतीचे भूमिपूजन

Skillful education through innovation | नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण शिक्षण द्या

नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण शिक्षण द्या

Next

कोल्हापूर : एकविसाव्या शतकात विकासाच्या दिशा या रस्त्यांद्वारे नव्हे, तर संवादाच्या माध्यमातून जात आहेत. जगातील सर्व ज्ञान तंत्रज्ञानात समाविष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठांनी डिजिटल शिक्षण पद्धती आणि नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण शिक्षण द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन आणि वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागाच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार युवराज संभाजीराजे, राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाच्या (रुसा) महाराष्ट्र प्रकल्प संचालिका मनीषा वर्मा, विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक डॉ. डी. आर. मोरे प्रमुख उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘नॅसकॉम’च्या सर्वेक्षणानुसार आपल्या देशातील शंभर पदवीधरांपैकी २५ जणच रोजगारक्षम असल्याचे चित्र समोर आले आहे. अशा स्वरूपाची शिक्षण आणि कौशल्यांमध्ये दरी आहे. ही दरी कमी करण्यासह उच्च शिक्षणातील उपयोजिता वाढविण्यासाठी विद्यापीठांकडून प्रयत्न व्हावेत. डिजिटल शिक्षण पद्धती, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानाच्या कक्षा रुंदाविल्या पाहिजेत. व्हर्च्युअल क्लासरूम हे ज्ञानाचे भांडार आहे. या नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यापक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल. संवादशास्त्र, मास कम्युनिकेशनच्या नव्या इमारतीतून विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण देण्यात यावे. पत्रकारितेसह सर्व क्षेत्रांतील आव्हाने सध्या बदलली आहेत. ती लक्षात घेऊन नवनवीन अभ्यासक्रमांची रचना करण्यात यावी. यात अत्याधुनिक व नवतंत्रज्ञानाचा वापर करावा.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तावडे म्हणाले, उच्च शिक्षणातील गुणवत्तावाढीसाठी केंद्र सरकारने ‘रुसा’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यापीठांना एकूण ५५० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून व्हर्च्युअल क्लासरूम, अद्ययावत ग्रंथालय, आदींद्वारे या विद्यापीठांतील गुणवत्तावाढीला मदत होणार आहे. कार्यक्रमात वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागाच्या इमारतीचे डिजिटल कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते, तर राजर्षी शाहू केंद्र व म्युझियम कॉम्प्लेक्सच्या कोनशिलेचे अनावरण उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फे्रमवर्कमध्ये विद्यापीठाला २८ वा क्रमांकाबद्दलचे गौरवपत्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. शिंदे यांना प्रदान केले. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ. आर. के. कामत, आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर व नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

विद्यापीठाने आघाडीवरच राहावे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या शिवाजी विद्यापीठाने नेहमी आघाडीवरच राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. ते म्हणाले, विद्यापीठाने मिळविलेले नॅकचे ‘अ’ मूल्यांकन, एनआयआरएफमधील २८ वा क्रमांक, आता ‘रूसा’द्वारे व्हर्च्युअल क्लासरूमची सुरुवात हे प्रशंसनीय आहे. देशात प्रथमस्थानी विद्यापीठाने आता भरारी घ्यावी. प्रगतीसाठी विद्यापीठाच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे राहील.

Web Title: Skillful education through innovation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.