कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमातून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण व्हावे : कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:24 AM2021-08-29T04:24:17+5:302021-08-29T04:24:17+5:30
कोल्हापूर : नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारत असताना आपल्या अभ्यासक्रमातून निरंतर कौशल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. या शिक्षणातून विद्यार्थ्यांनी ...
कोल्हापूर : नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारत असताना आपल्या अभ्यासक्रमातून निरंतर कौशल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. या शिक्षणातून विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात यशस्वीपणे उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी दर्जेदार कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम आजच्या काळाची गरज आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास या शिक्षणाचा उपयोग निश्चितपणे विद्यार्थ्यांना होईल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व व्यंकटेश महाविद्यालय इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. शिर्के बोलत होते. यावेळी डॉ. नंदकुमार मेकोथ, विभागाचे संचालक डॉ. ए. एम. गुरव, हरिष बोहरा, प्राचार्य व्ही. ए. माने उपस्थित होते. वेबिनारला देशभरातून ३४६ शिक्षक, संशोधक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षण क्षेत्रावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची जबाबदारी वाढली आहे. या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये प्रत्येक विदयार्थी हा गुणवत्तापूर्ण, उदरनिर्वाहक्षम बनविणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांची अधिकाधिक रचना होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळत नाही. अशावेळी शाळा, महाविद्यालयांनी आपला विदयार्थी रोजगारक्षम बनविण्यासाठी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे असून या कौशल्य प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान त्याला भावी जीवनात उपयुक्त ठरेल. आज नवीन शैक्षणिक धोरणामध्ये उद्योजकता व रोजगार निर्मिती या बाबीसाठी असणारे महत्त्व सर्व शाळा, महाविद्यालयांनी अभ्यासून त्यानुसार सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे बीजभाषण करताना गोवा व्यवस्थापन संस्थेचे प्रा. डॉ. नंदकुमार मेकोथ म्हणाले, आज केवळ कौशल्य प्रशिक्षण महत्त्वाचे आहे, याबाबत चर्चा होताना आपण पाहतो. परंतु कौशल्य विकासाकडे विद्यार्थ्यांनी अतंत्य सूक्ष्मपणे पाहून आपले जीवन यशस्वीपणे जगण्यासाठी विविध कौशल्ये परिपूर्णतेने आत्मसात करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात डॉ. बी. एम. हिर्डेकर व डॉ. अनिल राव यांनीही विचार मांडले.
विभागाचे संचालक डॉ. ए. एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य व्ही. ए. माने यांनी स्वागत केले. यावेळी शुभांगी जरंडीकर, डॉ. सुमन बुवा, महेश चव्हाण, यशोधन बोकील, अतुल एतवाडेकर व आयोजन समितीचे सर्व घटक उपस्थित होते.