झाले माेकळे आकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:17 AM2021-01-10T04:17:50+5:302021-01-10T04:17:50+5:30
कोल्हापूर : कडाक्याच्या थंडीचा महिना असलेल्या जानेवारीत अवकाळीच्या रूपाने आलेल्या पावसाने कोल्हापुरातील चार दिवसांचा मुक्काम शनिवारी दुपारपासून हलवला. काळ्याभोर ...
कोल्हापूर : कडाक्याच्या थंडीचा महिना असलेल्या जानेवारीत अवकाळीच्या रूपाने आलेल्या पावसाने कोल्हापुरातील चार दिवसांचा मुक्काम शनिवारी दुपारपासून हलवला. काळ्याभोर ढगांनी व्यापलेले आभाळ निरभ्र झाल्याने आणि सूर्यदर्शन घडल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, शुक्रवारी रात्री पावसाने लावलेली हजेरी शनिवारी सकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी कायम होती.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम होऊन कोल्हापुरात चार दिवसांपासून पावसाळी वातावरण होते. दररोज पाऊस पडत होता. थंडीऐवजी पावसाचा आणि विचित्र हवामानाचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकही वैतागले होते. कुठे तुरळक, तर कुठे जोरदार पावसाचा सामना करावा लागत असल्याने नुकसानीचा टक्काही वाढत चालला होता.
शनिवारी सकाळीही असेच आभाळ भरून आले होते. दिवसभर पावसाचा मुक्काम कायम राहील, अशीच शक्यता वाटत होती, पण बारानंतर वातावरणात बदल होऊ लागला. हळूहळू सूर्यदर्शन घडू लागल्याने वातावरणही निवळू लागले. दुपारनंतर तर आणखी बदल होत जाऊन संध्याकाळपर्यंत तब्बल चार दिवसांनी निळ्याभोर आकाशाचे दर्शन कोल्हापूरकरांना झाले.
चौकट ०१
आता थंडी परतणार
हा आठवडा असाच कमी-अधिक तापमानाचा आणि काहीसा अधून मधून अंशत: ढगाळ वातावरणाचा राहणार आहे, पण पाऊस मात्र अजिबात येणार नाही. त्यानंतर मात्र थंंडीचा कडाका वाढत जाईल आणि महिनाअखेरपर्यंत चांगल्या थंडीचा अनुभव घेता येणार आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
चौकट ०२
थांबलेले चक्र पुन्हा गती घेणार
पावसामुळे ऊसतोडीचे चक्र विस्कटले होते. गुऱ्हाळघरेही बंद होती. आता याची चाके नव्याने गती घेणार आहेत. पावसाळी वातावरणामुळे पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याच्या फवारण्यांच्या कामांनाही आता वेग येणार आहे.