इमारतीचा स्लॅब कोसळून वृद्धा ठार; चौघेजण जखमी
By Admin | Published: February 29, 2016 01:18 AM2016-02-29T01:18:10+5:302016-02-29T01:18:42+5:30
लाड चौकातील घटना : माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांची इमारत
कोल्हापूर : मंगळवार पेठ, लाड चौकातील माजी महापौर व काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या ‘सुप्रभा मंच’ या सभागृहाच्या पाचव्या मजल्यावरील कच्चा स्लॅब कोसळून लग्नसमारंभाला आलेली वृद्धा जागीच ठार झाली, तर चौघेजण गंभीर जखमी झाले.
शालाबाई शामराव शिंदे (वय ६०, रा. कोगे, ता. करवीर) असे त्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
जखमीमध्ये संदीप अरुण कारेकर, युवराज वसंत भोसले (२२), शुभम कुंभार (१९), संतोष चौगले (३०, सर्व रा. लक्ष्मी गल्ली, पापाची तिकटी) यांचा समावेश असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरदुपारच्या या घटनेमुळे लग्नसमारंभ कार्यक्रमावर दु:खाचे सावट पसरले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लाड चौकात माजी महापौर व काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांची चारमजली इमारत आहे. या इमारतीच्या सुरुवातीला ‘सुप्रभा मंच’ सांस्कृतिक सभागृह आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्याचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. रविवारी या मजल्याच्या स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, सभागृहामध्ये राकेश प्रकाश जाधव (रा. लक्ष्मी गल्ली, पापाची तिकटी) या तरुणाचे लग्न होते. सकाळपासून याठिकाणी पै-पाहुण्यांची धांदल सुरू होती. अक्षतांचा मुहूर्त साडेबाराचा पार पडल्यानंतर पै-पाहुणे जेवणाच्या गडबडीत होते. सभागृहात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. खाली लग्नाचा कार्यक्रम आणि पाचव्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते.
दुपारी पावणेतीनच्या सुमारास लाकडी फळी निसटल्याने पाचव्या मजल्यावरील स्लॅब सभागृहाबाहेर उभारलेल्या पत्र्याच्या मंडपावर कोसळून मोठा आवाज झाला. स्लॅबखाली शांताबाई शिंदे या सापडल्याने गोंधळ उडाला तर स्लॅब व पत्रा अंगावर पडून संदीप कारेकर, युवराज भोसले, शुभम भोसले, संतोष चौगले हे जखमी झाले.
जखमींची आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. घटनेची माहिती समजताच जुना राजवाडा पोलीस व अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत स्लॅब बाजूला केला असता शालाबाई शिंदे निपचित पडल्या होत्या. नातेवाईक सचिन जाधव, सुनील लंगोटे यांनी रिक्षातून त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. याठिकाणी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अन्य जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले.
जबरदस्तीने मृतदेह हलविला
४शालाबाई शिंदे यांना सचिन प्रकाश जाधव हे दुपारी सव्वातीनच्या सुमारास सीपीआरच्या अपघात विभागात घेऊन आले. वैद्यकीय अधिकारी विजयकुमार गाडवे यांनी शालाबाई यांची प्रकृती तपासली असता डोक्याची कवटी फुटून त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यांच्या छातीचा ईसीजी काढून मृत्यूची नोंद रजिस्टरमध्ये केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्याची सूचना वॉर्डबॉयना करत असतानाच वीस ते पंचवीस कार्यकर्ते अपघात विभागात घुसले.
४आम्ही खासगी रुग्णालयात घेऊन जातोय, असे सांगून शालाबार्इंचा मृतदेह उचलून घेऊ लागले. यावेळी डॉ. गाडवे यांनी शवविच्छेदन झाल्याशिवाय मृतदेह येथून हलविता येणार नाही, असे सांगितले; परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करत कार्यकर्त्यांनी मृतदेह उचलून तो इनोव्हा गाडीतून अॅस्टर आधार येथे आणला. कारवाई टाळण्यासाठी मृतदेहाची हेळसांड केल्याची संतप्त भावना सीपीआर परिसरात व्यक्त होत होती.
अधिकाऱ्यांचे मोबाईल ‘स्वीच आॅफ’
बांधकाम विनापरवाना : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुजोरा, अनेक अधिकाऱ्यांचे मौन
कोल्हापूर : लाड चौकातील माजी महापौर व काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या ‘सुप्रभा मंच’ या सभागृहाच्या पाचव्या मजल्यावरील कच्चा स्लॅब कोसळून अंगावर पडल्याने वृद्धा जागीच ठार झाली. दरम्यान, पाचव्या मजल्यावर टाकण्यात आलेल्या स्लॅबसाठी महानगरपालिकेकडून कोणताही रितसर परवाना घेण्यात आला नसल्याची धक्कादायक माहिती चौकशीत पुढे आली आहे. त्याबाबत महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे तर काही अधिकाऱ्यांनी माहिती देण्याचे टाळण्यासाठी चक्क मोबाईल फोनच बंद ठेवले.
दरम्यान, चव्हाण कुटुंबीय हे महापालिकेत किमान २५ वर्षे प्रतिनिधीत्व करत आहे. प्रल्हाद चव्हाण व त्यांचे चिरंजीव सागर चव्हाण या दोघांनीही गेल्या पाच वर्षांत महापौरपद भूषविले आहे तर सचिन चव्हाण हे स्थायी समितीचे माजी सभापती होते.
सध्या जयश्री सचिन चव्हाण या महापालिकेवर प्रभागाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. अख्खे चव्हाण कुटुंबीय महापालिकेवर प्रतिनिधीत्व करत असतानाही या पाचव्या मजल्यावर बांधकाम करताना त्यांनी परवाना घेतला नसल्याची माहिती पुढे आली आहे.
या पाचव्या मजल्यावरील बांधकामाला परवानी घेतली आहे काय याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता परवाना विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी चक्क आपला मोबाईलच बंद ठेवल्याचे निदर्शनास आले, तर काहींनी मोबाईल फोन न उचलणेच पसंद केले. त्याद्वारे माहिती देऊन आपण अडचणीत येऊ नये याची दक्षता काही अधिकाऱ्यांनी घेतल्याचे दिसून आले.
या परवाना विभागाचे उपशहर अभियंता रमेश मस्कर यांनी मोबाईल सायंकाळनंतर ‘स्वीच आॅफ’ ठेवला होता तर त्यांचे सहकारी व्ही. आर. पाटील यांनीही मोबाईल न उचलणेच पसंद केले.
रात्री उशिरा पाटील यांचा फोन आला पण आपल्याला ही घटना घडली असल्याचेही माहीत नसल्याचे सांगितले. उपायुक्त नितीन देसाई यांनीही सायंकाळी अशी घटना घडल्याचे माहीत नसल्याचे सांगितले.
महापालिकेच्या नियमानुसार दि. २५ फेब्रुवारी २०१४ पासून अशा बांधकामासाठी परवाना देण्याचे अधिकार सर्वस्वी हे त्या-त्या वॉर्ड आॅफिसकडे शहर उपअभियंत्यांकडे देण्यात आलेले आहे पण चव्हाण यांच्या पाचव्या मजल्यावरील बांधकाम परवाना घेण्यात आला आहे काय याच्या माहितीबाबत प्रत्येक अधिकाऱ्याने कानावर हात ठेवून ‘ही घटना घडल्याचे आम्हाला आताच समजले’ अशी उत्तरे रात्री दहा वाजेपर्यंत दिली.
त्यामुळे अधिकारी कशा पद्धतीने आपल्यावरील जबाबदारी झटकतात याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. काही अधिकाऱ्यांनी चव्हाण कुटुंबीयांकडून असा कोणताही परवाना अर्ज आपल्या विभागात आला नसल्याचे सांगितले. मात्र, या आधिकाऱ्यांनी आपली नावे गोपनीय ठेवण्याची मागणीही केली. रेकॉर्ड विभागातील अंतिम परवाना देणाऱ्यांनीही अशाप्रकारचा कोणताही परवाना आमच्याकडून गेलेला नसल्याबाबत दुजोरा दिला.
लाड चौकातील पाचव्या मजल्यावरील बांधकामाबाबत चव्हाण कुटुंबीयांकडून आपल्या कार्यालयाकडे बांधकाम परवाना मागणीचा कोणताही अर्ज करण्यात आलेला नाही, तसेच अशाप्रकारच्या बांधकामाला आमच्याकडून परवाना देण्यात आलेला नाही.
- सुनील बाईत, कनिष्ठ अभियंता, कोमनपा
या इमारतीच्या बांधकाम परवान्याचे सर्वस्वी अधिकार हे वॉर्ड कार्यालयाला देण्यात आले आहेत. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर बांधकामाचा परवाना देण्यात आलेला आहे का? याचीही चौकशी करून त्याबाबत कारवाई करण्यात येणार आहे.
- नेत्रदीप सरनोबत, कोल्हापूर शहर अभियंता, कोमनपा