स्लॅब कोसळून २० मजूर जखमी
By Admin | Published: February 4, 2016 01:08 AM2016-02-04T01:08:36+5:302016-02-04T01:08:36+5:30
धर्मनगर येथील घटना : चौघे गंभीर; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; सर्व जखमी बेळगावचे
जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील धर्मनगर येथे मंदिर सभागृहाचा स्लॅब कोसळून सुमारे २० मजूर जखमी झाले. यामध्ये चौघेजण गंभीर असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. या घटनेनंतर तीन रुग्णवाहिकेतून जखमींना तातडीने जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व मजूर कर्नाटकातील बेळगाव येथील आहेत.
निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील श्री क्षेत्र धर्मनगर येथे मंदिराच्या सभागृहाचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. बुधवारी सभागृहाचा स्लॅब टाकण्याचे काम सकाळी साडेसातच्या सुमारास सुरू झाले. पाईपद्वारे तयार काँक्रीट टाकण्याचे काम सुरू होते. १८ हून अधिक जण स्लॅबवर काम करीत होते, तर तिघेजण खाली होते. दोन ट्रक स्लॅब टाकल्यानंतर तिसऱ्या ट्रकच्या वेळी प्रेशर पाईपद्वारे काँक्रीट स्लॅबवर पोहोचविण्याचे काम सुरू असताना प्रेशर पाईपच्या धक्क्याने स्लॅबच्या मदतीसाठी लावलेला लोखंडी खांब निसटला. त्यानंतर बघताबघता स्लॅब खाली कोसळला. मजुरांना वाचविण्यासाठी मंदिर परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. सुरुवातीला हातकणंगले व जयसिंगपूरच्या १०८ या रुग्णवाहिकेतून जखमींना खासगी रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर घोडावत ग्रुपच्या रुग्णवाहिकेतून उर्वरित जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. यामध्ये प्रशांत मधुकर (वय २८), राजू बसरकट्टी (४५), निखिलेश म्हाथो (२५) व धुळाप्पा कुळकट्टी (३०) हे चौघेजण गंभीर जखमी असून, आप्पासाहेब जनगोंडा (३०), सुभाष जनगोंडा (३२), बाहुबली शंकरगोंडा (३२), रवी शंकरगोंडा (२२), प्रशांत शंकरगोंडा (३२), गणपत (३२), शांतीनाथ (३८), महावीर बस्तवाडे (३२), पिंटू निगडोळे (३२), अमर कांबळे (२६), बालेखान नदाफ (३२), राजेशकुमार म्हाथो (३३), सुभाष म्हाथो (२८, सर्व रा. बेळगाव) हे किरकोळ जखमी झाले. यांच्यासह उर्वरित जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले.
केवळ दैव बलवत्तर म्हणून...
६० बाय ७० फूट आकाराच्या सभागृहाचा स्लॅब सुरू असताना १८ हून अधिक मजूर स्लॅबवर काम करीत होते, तर प्रशांत मधुकर, राजू बसरकट्टी व अनिल वडर हे तिघे मजूर खाली होते. अचानक स्लॅब कोसळत आहे हे अनिलच्या लक्षात येताच तो बाजूला झाला.