कोल्हापुरात फ्लॅट भरदिवसा फोडला
By admin | Published: May 13, 2014 12:45 AM2014-05-13T00:45:46+5:302014-05-13T00:45:46+5:30
नागाळा पार्कात घबराट : रोख रकमेसह पावणेचार लाखांचे दागिने लंपास
कोल्हापूर : येथील नागाळा पार्कातील वारणा बँकेसमोर असलेल्या सिंड्रेलाज कॅसल रेसिडेन्शिअल विंग अपार्टमेंटमधील तिसर्या मजल्यावरील फ्लॅट नंबर बी-३ या बंद फ्लॅटचे कुलूप-कोयंडा कटावणीने तोडून चोरट्यांनी रोख रक्कम एक लाख व नऊ तोळे सोन्याचे दागिने, असा सुमारे ३ लाख ७० हजार किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याचे आज (सोमवार) सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आले. भरदिवसा झालेल्या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. दसरा चौक ते महावीर कॉलेजकडे जाणार्या रस्त्याला लागून वारणा बँकेच्या समोरील सिंड्रेलाज कॅसल रेसिडेन्शिअल विंग अपार्टमेंट ही पाच मजली इमारत आहे. या इमारतीत बारा कुटंबे सध्या राहण्यास आहेत. तिसर्या मजल्यावरील फ्लॅट नं. बी-३ मध्ये ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक विश्वास शंकर दिवे (वय ३५, मूळ गाव बांबवडे, ता. शाहूवाडी) हे कुटुंबासह राहण्यास आहेत. आज दुपारी दोनच्या सुमारास ते कुटुंबासह आंबवडे (ता. पन्हाळा) येथील नातेवाइकांच्या वास्तुशांतीसाठी फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावून गेले. दरम्यान, बंद फ्लॅट पाहून चोरट्यांनी दरवाजाबाहेरील लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर आतील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. देवघरातील तिजोरीला लॉक नव्हते. त्यातील नऊ तोळे सोन्याचे दागिने असलेला बॉक्स त्यामध्ये लक्ष्मीहार, अंगठ्या, चेन, रिंगा यासह रोख रक्कम एक लाख रुपये चोरट्यांनी लंपास केली. यावेळी घरातील सर्व साहित्य चोरट्यांनी अस्ताव्यस्त विस्कटून टाकले होते. बेडरूममधील कपाट त्यांनी फोडले; परंतु त्यामध्ये त्यांना काही मिळाले नाही. नातेवाईकांचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी सहाच्या सुमारास दिवे कुटुंबीय घरी आले असता त्यांच्या फ्लॅटला कुलूप नसल्याचे दिसले. आतमध्ये जाऊन पाहिले असता सर्व साहित्य विस्कटलेले व तिजोरीतील दागिने व पैसे गायब झाल्याचे दिसले. घरामध्ये चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलिसांना कळविले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, सहायक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड हे सहकार्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण फ्लॅटची पाहणी केली. महिन्यापूर्वी नागाळा पार्कमध्ये दोन घरफोड्या झाल्या होत्या. त्याच पद्धतीने ही घरफोडी झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार गोयल यांनी तपास युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले. घटनास्थळी ठसेतज्ज्ञांसह श्वान पथकास पाचारण करण्यात आले. सुजी श्वान परिसरातच घुटमळले. अपार्टमेंटच्या समोर वारणा बँकेचा सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्याचे फुटेज उद्या (मंगळवार) तपासण्यात येणार आहे. आजूबाजूच्या प्लॅटमधील इतर रहिवाशांसह समोरील इमारतीच्या वॉचमनकडे पोलिसांनी चौकशी केली. याप्रकरणी रात्री उशिरा शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली. (प्रतिनिधी) फेरीवाल्यांना प्रवेश नाही या अपार्टमेंटच्या दर्शनी बाजूच्या भिंतीवर सेल्समन, फेरीवाले यांना आतमध्ये प्रवेश नाही, अशी सक्त सूचना लिहिली आहे. परंतु या इमारतीमध्ये कोण येतो, कोण जातो, याची चौकशी कोणीच करीत नसल्याचे पोलिसांना दिसून आले. तिसर्या मजल्यावर घरफोडी झाल्याची माहिती पहिल्या व दुसर्या मजल्यावरील रहिवाशांनाही नव्हती. (प्रतिनिधी) नुकताच गृहप्रवेश ४विश्वास दिवे यांचे मूळ गाव सांगाव (ता. शिराळा) परंतु त्यांची पत्नी जयश्री या खुटाळवाडी (ता. शाहूवाडी) येथे ग्रामसेवक असल्याने ते अनेक वर्षांपासून बांबवडे येथे राहात होते. ४काही महिन्यांपूर्वी त्यांनी कोल्हापुरात फ्लॅट खरेदी केला. त्याची वास्तुशांती पाचच दिवसांपूर्वीच झाली आहे. त्यापासून ते याठिकाणी राहण्यास होते. ४वास्तुशांतीमध्ये आलेल्या प्रेझेंटची रक्कम, पत्नीच्या कार्यालयातील व सासूंच्या पर्समधील अशा सुमारे एक लाखाच्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला.