कोल्हापूर-गारगोटी मार्गावर झाडांची कत्तल
By admin | Published: March 7, 2017 12:16 AM2017-03-07T00:16:25+5:302017-03-07T00:16:25+5:30
रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण : पन्नास वर्षांपूर्वी रस्त्याच्या दुतर्फा केली होती वेगवेगळ्या जातीच्या वृक्षांची लागवड
शिवाजी सावंत ल्ल गारगोटी
कोल्हापूरहून गारगोटीकडे येताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली गर्द हिरव्या झाडांची रांग पाहिली की, प्रवाशांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. मनाबरोबरच डोळ््याला आल्हाददायक वाटणारे हे वृक्ष रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे तोडले जात आहेत.
कोल्हापूर-गारगोटी-गडहिंग्लज-गारगोटी-पाटगाव या महामार्गाच्या रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी या रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला वेगवेगळ्या जातीच्या वृक्षांची लागवड केली होती.
निलगिरी, आॅस्टे्रलियन बाभूळ, गुलमोहर, वटवृक्ष, बाभूळ, आंबा याशिवाय आणखी काही स्थानिक प्रजातींचा समावेश होता. ही झाडे डेरेदार व उंच झाली होती.
यामुळे रस्त्यावर नेहमी सावली असायची. भुदरगड तालुका तर कोकणाचे प्रवेशद्वार समजले जाते. गारगोटीपासून पाटगावकडे चालल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे इतकी घनदाट होती की, रात्री अपरात्री एकट्याने प्रवास करताना भीती वाटावी. कूरपासून नांगरगावमार्गे पिंपळगावपर्यंत तब्बल एक हजार दोनशे पंचेचाळीस झाडे होती. पाटगावपर्यंत हा आकडा कदाचित अर्धा ते पाऊण लाखांपर्यंत असेल. ही झाडे गारगोटी-कोल्हापूर मार्गाच्या रुंदीकरणामुळे सध्या तोडली जात आहेत.
सामाजिक बांधकाम विभागाचे उपअभियंता के. डी. मुधाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते
म्हणाले, रस्त्याचे रुंदीकरण होत असताना रस्त्याच्या लगत असणारी झाडे नाईलाजाने तोडावी लागत आहेत.
या झाडांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो, पण येत्या पावसाळ्यात लोकसहभागातून वृक्षारोपण करून हा मार्ग पुन्हा एकदा हरित करण्यात येणार आहे.
जोतिबा कडव यांचे कष्ट
गारगोटीपासून आकुर्डेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा जी झाडे सध्या दिसतात त्यामागे सा. बां. विभागाचे कर्मचारी, मैलकुली जोतिबा कडव (आकुर्डे) यांचे प्रचंड कष्ट आहेत.
त्यांनी उन्हातान्हात घागरीने पाणी आणून ही झाडे जगवली व ती वर्षांनुवर्षे मुलाबाळाप्रमाणे वाढवली. त्यांच्या स्मृतीची साक्ष देत ही झाडी मोठ्या अभिमानाने उभी आहेत. ते सध्या हयात नाहीत.