शैक्षणिक व्यासपिठचे ‘झोपमोड आंदोलन’
By admin | Published: November 15, 2015 01:02 AM2015-11-15T01:02:42+5:302015-11-15T01:05:03+5:30
चंद्रकांतदादा पाटील : मागण्यांबाबत शिक्षणमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ
कोल्हापूर : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर बैठक घेऊ, असे आश्वासन सहकारमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी रात्री येथे दिले. महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या शिष्टमंडळाने लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानाजवळ ‘झोपमोड आंदोलन’ केले. तत्पूर्वी, खासदार धनंजय महाडिक यांच्या रुईकर कॉलनी व शिरोलीतील आमदार महादेवराव महाडिक यांच्या निवासस्थानी शिष्टमंडळाने भेट देऊन निवेदन दिले. यावेळी पाटील यांनी शिष्टमंडळाला मिठाई दिली.
शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर विविध प्रकारच्या आंदोलनांचे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर नाळे कॉलनीतील निवासस्थानी शिष्टमंडळाने पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी पालकमंत्री पाटील यांनी हे आश्वासन दिले. या आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून ३० नोव्हेंबरला समितीच्या वतीने पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
२८ आॅगस्ट २०१५ रोजीचा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा अहवाल त्वरित मान्य करावा, खासगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम करावी, प्राथमिक शाळांमध्ये लिपिक व सेवकांची पदे मान्य करावीत, शिक्षक व शिक्षकेतरांना शालाबाह्ण कामे न देणे, अनुदानास पात्र शाळा / कनिष्ठ महाविद्यालये व वर्ग तुकड्यांना अनुदान मिळावे, आदी मागण्यांसाठी समितीच्या वतीने आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून ७ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले होते. शिष्टमंडळात सभाध्यक्ष एस. डी. लाड, डी. जी. लाड, व. ज. देशमुख, आर. वाय. पाटील, प्रा. एस. बी. उमाटे, उदय पाटील, आर. डी. पाटील, शिवाजी कोरवी, बी. जी. बोराडे, आदींचा सहभाग होता.(प्रतिनिधी)