महापालिकेच्या आठ प्रभागांत किंचित बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:49 AM2020-12-11T04:49:43+5:302020-12-11T04:49:43+5:30
कोल्हापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महानगरपालिका क्षेत्रातील मतदार नोंदणी वाढल्यामुळे किमान चार ते पाच प्रभागांत किंचित ...
कोल्हापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महानगरपालिका क्षेत्रातील मतदार नोंदणी वाढल्यामुळे किमान चार ते पाच प्रभागांत किंचित बदल होणार आहेत; परंतु त्याचा परिणाम आठ ते दहा प्रभागांवर होईल. हा बदल करताना महापालिका अधिकाऱ्यांची बरीच धावपळ झाली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महापालिका क्षेत्रात नव्याने मतदार नोंदणी झाली आहे. हीच मतदार यादी महापालिका निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. या निवडणुकीसाठी साधारण साडेसहा हजार ते सात हजार मतदारांचा एक प्रभाग करण्यात येतो; परंतु गेल्या पाच वर्षांत चार ते पाच प्रभागांत ही संख्या सात हजारांच्या पुढे गेली असल्याचे महापालिका प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे जादा मतदार दुसऱ्या प्रभागात जोडण्याची प्रक्रिया पार पाडावी लागली. त्याचा परिणाम अन्य चार ते पाच प्रभागांवर झाला आहे.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व साहाय्यक आयुक्त विनायक औंधकर सोडले तर महानगरपालिका प्रशासनाकडे सध्या निवडणुकीचा अनुभव असलेला एकही अधिकारी नाही. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचनेवेळी बुधवारी अधिकाऱ्यांचा गोंधळ उडालेला होता. दिवसभर काम करूनही अधिकाऱ्यांना आपण केलेले बदल योग्य आहेत, असे आत्मविश्वासपूर्वक सांगता आले नाही. या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती मागविण्यात येणार आहेत. त्यावेळीच प्रभाग रचनेतील फेरफार योग्य आहेत की नाही, हे अधिक स्पष्ट होणार आहे.